ससूननंतर ललितचा पंचवटीत मुक्काम, २५ लाख घेऊन झाला पसार 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील उर्फ पाटील हा २ ऑक्टोबरला पुणे येथील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर नाशिकला एक रात्र मुक्कामी होता. ललित हा पंचवटीत एका महिलेच्या घरी मुक्कामी असल्याचे व महिलेकडून २५ लाख रुपये घेऊन पसार झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा ताबा पुणे पोलिसांना दिला आहे.

ससून रुग्णालयात एमडीसह एकास पकडल्यानंतर ड्रग्जची साखळी उघड होत आहे. रुग्णालयातच उपचाराच्या बहाण्याने अनेक महिन्यांपासून रुग्णालयात थांबलेल्या ललितचा सहभाग उघड झाला. त्यानंतर ललित दोन ऑक्टोबरला सायंकाळी रुग्णालयातून पसार झाला. पसार झाल्यानंतर ललितने रुग्णालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला व तेथून पुणे शहराबाहेर पडला. दरम्यान, त्याने पुणे सोडल्यानंतर नाशिक गाठले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकला पंचवटीतील एका महिलेकडे त्याने रात्रभर मुक्काम केला. या महिलेकडे ललितचा भाऊ भुषण याने २५ लाख रुपये दिले हाेते. हे पैसे घेऊन तो पसार झाला. शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने महिलेकडे चौकशी सुरु केल्यानंतर तिने पैसे दिल्याची कबुली दिली. तसेच तिच्याकडून पोलिसांनी ५ लाख १२ हजार रुपयांची ५ किलो चांदीही जप्त केली आहेे. ललितने चांदी न नेता फक्त रोकड नेल्याचे स्पष्ट झाले.

फोनवरुन सतत संपर्क

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित हा महिलेच्या सतत संपर्कात होता. फोनवरून माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. तसेच ‘तुझ्यावर काही कारवाई होणार नाही’ असे सांगून महिलेस धीर देण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिस मागावर असल्याचे समजल्यानंतर तो सावध झाला.

ललितचा असा झाला प्रवास

पुणे येथील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबरला पळाल्यावर त्याने तिथल्याच एका पंचतारिकांत हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत वेळ घालवला. त्यानंतर पुणे येथून नाशिकमध्ये मुक्काम केला. येथून पैसे घेत त्याने त्याने चाळीसगाव गाठले. तिथे दोन-तीन दिवस मुक्काम केल्याचे समोर आले. चाळीसगाव येथून तो छत्रपती संभाजीनगरला आणि तेथून इंदूर आणि तेथून सूरतमार्गे गुजरातमधील जामनगरला गेला होता. तिथे तीन दिवस मुक्काम करुन पुन्हा नाशिकमार्गे सोलापूरला गेला. त्यानंतर तो बंगळुरूमध्ये मुक्कामी होता. याच ठिकाणी साकीनाका पोलिसांनी ललितला अटक केली आहे. बंगळुरूमधून चेन्नईमार्गे ललित श्रीलंकेत पळून जाणार होता, असे पोलिस तपासात समोर आले.

हेही वाचा :

The post ससूननंतर ललितचा पंचवटीत मुक्काम, २५ लाख घेऊन झाला पसार  appeared first on पुढारी.