सहकारी कारखानदारीची खासगीकरणाकडे वाटचाल; साखर उद्योगात खानदेशची पीछेहाट 

मालेगाव (जि.नाशिक) : देशात एकेकाळी साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य अव्वल होते. सहकार क्षेत्रात साखर उद्योगाने भरारी घेतली होती. मात्र, नंतरच्या काळात गैरव्यवहार व गलथान कारभारामुळे अनेक कारखाने बंद पडले. कर्जाचा डोंगर वाढल्याने ते विक्रीला निघून, खासगी भांडवलदारांच्या मालकीचे झाले.

खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढली

मुबलक उसामुळे राज्यात यंदा २४६ पैकी १८८ साखर कारखाने सुरु झाले. त्यात, यंदाच्या गळीत हंगामात सहकार व खासगी साखर कारखान्यांमध्ये जवळपास बरोबरी साधली गेली आहे. यावर्षी ९५ सहकारी आणि ९३ खासगी साखर कारखान्यांतून उत्पादन घेण्यात आले. राज्यात एकूण २४६ साखर कारखाने आहेत. यातील ५८ कारखाने आजारी आहेत. काही अवसायनात गेली आहेत. तर काहींची कर्जामुळे पुन्हा सुरू होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. सहकार क्षेत्र डबघाईला गेल्याने खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत गेली.

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

तीस वर्षांत सहकार क्षेत्राला घरघर

राज्यातील साखर उद्योगाची सहकारातील पाळेमुळे खोलवर रोवली गेली होती. स्वातंत्र्यापूर्वी १९३२ मध्ये रावळगाव हा देशातील पहिला खासगी साखर कारखाना कार्यरत झाला. यानंतरही सहकारी साखर कारखान्यांचे वलय कमी झाले नाही. तीस वर्षांत सहकार क्षेत्राला घरघर लागल्याने खासगीकरणाला चालना मिळाली. एकीकडे सहकारी कारखाने बंद पडत गेले, तर दुसरीकडे खासगी कारखान्यांची संख्या वाढत गेली. कोल्हापूर व पुणे विभागांत सहकारी साखर कारखानदारीचा दबदबा कायम आहे. सोलापूर व नांदेड विभागात खासगी साखर कारखान्यांनी हातपाय रोवले आहेत. २०२०-२१च्या गळीत हंगामात १८८ कारखान्यांच्या माध्यमातून १५ मार्चअखेर राज्यात ९०५.५१ लाख टन उसाचे गाळप झाले. तर, ९४०.४८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३९ आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

साखर उद्योगात खानदेशची पीछेहाट 
साखर उद्योगात उत्तर महाराष्ट्र एकेकाळी आघाडीवर होता. २१ कारखाने या भागात होते. त्यामुळे विभागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली होती. सध्या उद्योगाची पीछेहाट झाली आहे. या वर्षी कादवा, वसंतदादा सहकारी, रावळगाव, द्वारकाधीश, सातपुडा-तापी, आदिवासी, पुष्पदंतेश्‍वर, संत मुक्ताबाई शुगर ॲन्ड एनर्जी असे केवळ आठ कारखाने सुरू झाले. १५ मार्चअखेर यातील निम्मे कारखाने बंद झाले. निफाड, के. के. वाघ, नाशिक-पळसे, गिरणा आर्मस्ट्रॉँग, केजीएस शुगर, पांझराकान, शिरपूर, वसंत कासोदा, मधुकर, बेलगंगा, चोपडा, रावेर तालुका व मौनगिरी असे एकूण १३ कारखाने विविध कारणांमुळे बंद आहेत. बंदपैकी एक-दोन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखाने पुढील हंगामातही सुरू होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. 
 
२०२०-२१चा गळीत हंगाम सुरू झालेले कारखाने 
विभाग सहकारी खासगी एकूण 
कोल्हापूर- २५ १२ ३७ 
पुणे - १८ १३ ३१ 
सोलापूर- १४ २८ ४२ 
नगर- १६ १० २२ 
औरंगाबाद- १२ १० २२ 
नांदेड- १० १५ २५ 
अमरावती- ०० ०२ ०२ 
नागपूर- ०० ०३ ०३ 
---------------------- 
एकूण- ९५ ९३ १८७