सहा महिन्यानंतर चिकनचे भाव दोनशे पार; आवक घटल्याचा परिणाम

जुने नाशिक : गेल्या सहा महिन्यात प्रथमच चिकनचे दर दोनशे पार गेले आहे. विविध कारणामुळे ९० ते दीडशेच्या आतच चिकनचे दर होते. मध्यंतरी चाळीस ते पन्नास रुपये किलो चिकन दर घसरले होते. सध्या झालेल्या वाढीने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. 

गेल्यावर्षी चिकनमुळेही कोरोना होत असल्याचे अफवा नागरिकांमध्ये प्रसारित झाली होती. त्याचा परिणाम चिकन विक्रीवर झाला. लॉकडाउनमुळे मुंबई, गुजरातकडे माल जाणेही बंद झाले होते. त्यामुळे पोल्ट्री, शेतकरी, कंपनी, व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर जिवंत कोंबड्यांचा माल पडून होता. आवक वाढली आणि चिकनचे दर कोसळले. काही दिवसांपर्यंत दीडशेच्या आत चिकन, तर शंभर रुपयाच्या आत जिवंत कोंबडी विक्री होत होती. सध्या २२३ ते ३०० रुपये किलो विक्री होत आहे. १५० रुपयांपर्यंत जिवंत कोंबडी विक्री होत आहे. उन्हाळ्यात चिकनचे दर कमी होतात. यंदा मात्र दर वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आवक घटल्याने दर वाढले आहे. गेल्या सहा महिन्यात प्रथमच चिकनच्या दराने उसळी घेतली आहे. असे जरी असले तरी दैनंदिन कमी जास्त दर होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. येणाऱ्या काही दिवसात आवक सुरळीत झाली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यताही विक्रेत्यांनी व्यक्त केली. भद्रकाली फुले मार्केट, मुख्य मार्केट असल्याने त्याभागात विक्रेत्यांची संख्याही अधिक असल्याने त्याठिकाणी जरी सव्वादोनशे, अडीचशे दर असले तरी शहराच्या विविध भागात २७० ते ३०० रुपये किलोने चिकन विक्री होत आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

उन्हाळ्यात दर कमी होत असले हे जरी खरे असले तरी सध्या आवक कमी झाली आहे. शिवाय कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने रोग प्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी नागरिक चिकन सेवनाकडे वळले आहे. त्यामुळे काही अंशी दर वाढले आहे. 
- शहानवाज मुलतानी, विक्रेता 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी