सह्यांनी केला घात! भाजपवर निवडणुक स्थगितीची नामुष्की; शिवसेनेला आयते उपसभापती पद

नाशिक : शहर सुधार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांच्या अर्जावर अनुमोदकांच्या स्वाक्षरीत तफावत आढळल्याने निवडणुकीला स्थगिती द्यावी लागली. उपसभापती पदाच्या निवडणुकीतही स्वाक्षरीत तफावत आढळल्याने अलका अहिरे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला.

स्वाक्षरीच्या तफावतीचा तिसरा अध्याय वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही दिसून आला. सभापती पदाचे उमेदवार पुष्पा आव्हाड यांची एका कागदावर मराठी तर दुसयावर इंग्रजी मधून स्वाक्षरी असल्याने या घोळामुळे भाजपवर निवडणुक स्थगितीची नामुष्की ओढावली. 

नेमका प्रकार काय घडला?

शहर सुधार समिती सभापती पदासाठी भाजपच्या छाया देवांग यांना शिवसेनेचे सुदाम डेमसे यांनी आव्हान दिले होते. अर्जांच्या छाननी प्रक्रियेत सौ. देवांग यांच्या अर्जावर सूचक म्हणून इंदूबाई नागरे यांची स्वाक्षरी होती. मात्र महापालिकेच्या रेकॉर्ड व अर्जावरील स्वाक्षरीत तफावत आढळल्याने शिवसेनेचे डेमसे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. डेमसे यांच्या अर्जाची छाननी केल्यानंतर सुचक म्हणून नगरसेविका राधा बेंडकोळी यांच्या स्वाक्षरीत देखील तफावत आढळल्याने दोन्ही अर्ज बाद ठरविताना निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतला. उपसभापती पदासाठी भाजपच्या अलका अहिरे यांना डेमसे यांचेचं आव्हान होते. सौ. अहिरे यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सुमन भालेराव यांची स्वाक्षरी होती. सौ. भालेराव यांनी अर्जावर स्वाक्षरी करताना फक्त सुमन भालेराव अशी केली तर महापालिकेच्या रेकॉर्डवर सुमन मधुकर भालेराव अशी पुर्ण नावानिशी स्वाक्षरी असल्याने सौ. अहिरे यांचा उपसभापती पदाचा अर्ज बाद ठरविण्यात आला.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

बहुमत असतानाही सभापती पदाची संधी हुकली

मात्र डेमसे यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. बहुमत असतानाही सभापती पदाचा अर्ज बाद ठरल्याने देवांग यांच्या हातून सभापती पदाची संधी हुकल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही भाजपच्या पुष्पा आव्हाड यांच्या स्वाक्षरीत तफावत आढळल्याने सभापती पदाची निवडणुक स्थगित करण्यात आली. उपसभापतीपदाचे उमेदवार निलेश ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळल

महिला, विधी समिती बिनविरोध 

महिला व बालकल्याण समितीची निवडणुक बिनविरोध पार पडली. सभापती पदी स्वाती भामरे यांची तर उपसभापती पदी मिरा हांडगे यांची निवड जाहीर करण्यात आली. विधी समिती सभापती पदी कोमल मेहोरोलिया तर उपसभापती पदी भाग्यश्री ढोमसे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.