सह्याद्रीचा माथा : गोदातीरी वादाची उड्डाणे…!

गोदाकाठी वसलेल्या नाशिकमध्ये वाद काही नवे नाहीत. अगदी साहित्यापासून ते समाजकारणापर्यंत इथं वाद यापूर्वीही रंगले. पण त्याला राजकीय वादाची फोडणी दिली, की सगळं पर्यावरण ढवळून निघतं. त्यात जर महापालिका निवडणुकीचं बिगुल फुंकलं गेलेलं असेल, तर काही विचारण्याची सोयच नाही. अगदी अलीकडे सुरू झालेल्या उड्डाणपुलांच्या श्रेयवादावरून सुरू झालेला वाद हा त्यातील पुढची कडी. त्रिमूर्ती चौक आणि मायको सर्कल येथे प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलावरून भाजप-शिवसेनेत हा वाद रंगतोय. या दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलांची घोषणा सत्ताधारी भाजपनं केली. या उड्डाणपुलांच्या भूमिपूजनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाशिकला आणण्याचं भाजपनं जाहीर केलं आणि लगोलग शिवसेनेने त्यास विरोध सुरू केला. शिवसेनेच्या विरोधाची धार पाहता भाजप बॅकफूटवर वाटतोय. मात्र या उड्डाणपुलांना स्थगिती देण्याचा धमकीवजा इशारा देऊन भाजप मोकळा झाला. तथापि, स्थगिती देणं पालिकेच्या नव्हे, तर राज्य सरकारच्या हाती असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली. राज्यात सरकार नसल्याने भाजपचा बचावात्मक पवित्रा दिसतो. राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष सध्या या प्रकरणी ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. 

वास्तविक, शहराच्या विकासासाठीचे असे वाद टाळणं हिताचं ठरेल. त्याचा एक भक्कम पुरावाही आहे. गंजमाळ ते सीबीएसदरम्यान शालिमार उड्डाणपूल महापालिकेने मंजूर केला होता. या भागात सध्याची विस्कळित वाहतूक आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता, तो उड्डाणपूल झाला असता तर वाहतूक किती सुकर झाली असती, याचा अंदाज नक्कीच बांधता येतो. या उड्डाणपुलाला काही मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला होता. तिथे कब्रस्थान असल्याने हा विरोध होता. मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी राज्य शासनाने पुलाला स्थगिती दिल्याचे तत्कालीन संदर्भ स्पष्ट करतात. हा वाद सध्या न्यायालयात आहे. विशेष म्हणजे त्या वेळी काही मोठ्या दुकानदारांचा विरोध आणि त्याला प्रभावशाली आमदाराची साथ मिळाल्याने तत्कालीन सरकारने उड्डाणपुलाला स्थगिती दिली. आता उड्डाणपुलाचा चेंडू कोर्टात आहे. या सगळ्यात शहराचं मात्र मोठं नुकसान झालं. 

मनसे सत्तेत असतानाही नाशिक रोड ते द्वारका यादरम्यान चार उड्डाणपूल प्रस्तावित होते. त्यातला पहिला उड्डाणपूल दत्तमंदिर, दुसरा उड्डाणपूल उपनगर, तिसरा विजय-ममता, तर चौथा उड्डाणपूल काठे गल्ली येथे प्रस्तावित होता. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे असल्याने अद्याप हे उड्डाणपूल थंड बस्त्यात आहेत. दशरथ पाटील महापौर असताना उत्तर महाराष्ट्रातील पहिला उड्डाणपूल नाशिक रोडला झाल्याची नोंद आहे. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन झाले होते. शोभना आहेर तेव्हा उपमहापौर होत्या. राज्यात तेव्हा भाजप-शिवसेना युती होती. आता प्रस्तावित असलेल्या त्रिमूर्ती चौक आणि मायको सर्कलच्या उड्डाणपुलांची स्थिती तर अजून बाल्यावस्थेतच आहे. अद्याप इथं भूमिपूजनही झालेले नाही. टेंडर आणि अन्य सगळ्या अनुषांगिक प्रक्रिया सुरू होण्यासही अवधी आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर प्रचंड वेगाने काम केले तर ते एखाद वर्षात ते पूर्ण होणं शक्य आहे. अन्यथा, किमान दोन-अडीच वर्षांचा कालावधी या पुलांना लागेल. त्यात वादाची ठिणगी पडलेली आहे.

अकारण वादापेक्षा हे उड्डाणपूल अधिकाधिक उच्च तंत्रज्ञान वापरून कसे सुंदर आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पूरक ठरतील, याचा विचार व्हायला हवा. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद अगदी मुंबईतही अलीकडच्या काळात झालेले उड्डाणपूल वाहनचालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरताहेत. अगदी बँकाँक, सिंगापूरच्याही उड्डाणपुलांच्या मॉडेलचा विचार येथील उड्डाणपूल उभारताना करता येऊ शकतो. जो अग्रक्रमाने व्हायला हवा; अन्यथा आपल्याकडचे उड्डाणपूल म्हणजे वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि अतिक्रमणांना पोषक असलेले ठरतात. शिवाय दुकानदारांचीही त्यात मोठी पंचाईत होते. या अडचणी दूर सारून उड्डाणपूल उभारले गेल्यास ते नक्कीच उपयुक्त ठरतील. वेगाने विकसित होत असलेले नाशिक हे देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे इथे घरांची आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळीही वाढतेय. त्यामुळे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांची इथे नितांत आवश्यकता आहे, असे असताना त्यास वादाची फोडणी अप्रासंगिक म्हणावी लागेल.