सांगा कधी होणार नाशिक स्मार्ट? चाळिशी उलटल्यानंतरही…

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : आसिफ सय्यद

नाशिक महापालिकेचा ४१ वा वर्धापन दिन मंगळवारी (दि. ७) साजरा होत आहे. ४२ व्या वर्षात पदार्पण करताना नाशिककरांच्या साक्षीने महापालिकेने आजवर अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. गेल्या ४१ वर्षांत कुणी गरिबी हटाव, झोपडपट्टी निर्मूलनाचा नारा दिला, कुणी नवनिर्माणाची हाक दिली तर, कुणी दत्तक विधान करत नाशिककरांना भुरळ घातली; परंतु नाशिकची सिंहस्थभूमी खरोखर स्मार्ट सिटी झाली का?, मुंबई, पुण्याबरोबर राज्यातील सुवर्णत्रिकोणातील शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकचा अपेक्षित विकास झाला का, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध नाशिककर आजही घेत आहेत.

१९८२ मध्ये नगरपालिकांतून कायाप्रवेश केलेल्या महापालिकेने स्वत:च्या उत्पन्नासह चार दशकांत कुंभमेळ्यांच्या निमित्ताने मिळालेल्या शेकडो कोटींच्या निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलला. परंतु अंदाजपत्रकीय खर्चाची आकडेवारी २५०० कोटींवर जाऊनही नाशिककर विकासाच्या प्रतीक्षेत आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे मूलभूत सुविधा पुरविण्यात महापालिकेची दमछाक होत असताना, गेल्या २४ वर्षांत महापालिकेत कुठलीही नोकरभरती होऊ शकलेली नाही. जकातीपाठोपाठ एलबीटीसारखे हक्काचे उत्पन्न गमावल्यानंतर जीएसटी अनुदानावर महापालिकेला अवलंबून राहावे लागत असल्यामुळे शासनाचे हे अनुदान बंद झाल्यास महापालिकेचा गाडा ढकलायचा कसा, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. मेट्रो निओ, लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क, गावठाणातील क्लस्टर योजना या सारख्या महत्त्वाकांक्षी योजना केवळ घोषणांपुरत्याच मर्यादित राहिल्या असून, नमामि गोदा, गंगापूर धरण थेट पाइपलाइन योजना, दारणा धरण थेट पाइपलाइन योजना, पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजना शासनाच्या निधीच्या अपेक्षेवर असल्याने शहराला स्वप्न दाखविणाऱ्या नेत्यांची नव्हे तर, विकास घडविणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.

अशी झाली महापालिकेची स्थापना

नाशिक महापालिकेला वैभवशाली इतिहास आहे. भूतपूर्व नाशिक नगरपालिका, नाशिकरोड-देवळाली नगरपालिका व तत्कालीन सातपूर नगरपालिका तसेच या नगरपालिकांलगतची २३ खेडी एकत्र करून, दि. ७ नोव्हेंबर १९८२ रोजी नाशिक महापालिका अस्तित्वात आली. महापालिकेचे क्षेत्रफळ २५९ चौरस किलोमीटर इतके आहे. महापालिकेची स्थापना झाली, तेव्हा शहराची लोकसंख्या जेमतेम ४.५० लाख इतकी होती. गेल्या ४१ वर्षांत नाशिक शहराच्या लोकसंख्येत तब्बल पाचपटींहून अधिक वाढ झाली आहे. शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. तर शहरातील मिळकतींची संख्या ५.४४ लाखांवर गेली आहे. महापालिकेचे सुरुवातीचे ११ कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक आता २४७७ कोटींवर पोहोचले आहे. शहरात २३०० किलोमीटर लांबीचे रस्ते २२०० किलोमीटर लांबीच्या गटारी, तर २१०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे जाळे आहे.

प्रशासकीय राजवट, लोकशाही ते पुन्हा प्रशासकीय राजवट

नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीची 10 वर्षे १९८२ ते १९९२ प्रशासकीय राजवट होती. सुधाकर जोशी हे महापालिकेचे पहिले प्रशासक होते. त्यानंतर सी. दो. चव्हाण, बी. सी. खटुआ, रत्नाकर कुलकर्णी, रत्नाकर बनसोड आणि अजय मेहता यांनी नाशिक महापालिकेचे प्रशासन म्हणून १९९२ पर्यंत कार्यभार सांभाळला. त्यानंतर १९९२ पासून लोकशाही राजवटीला प्रारंभ झाला. २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका लांबल्यामुळे पुन्हा प्रशासकीय राजवटीची नामुश्की ओढवली. कैलास जाधव, रमेश पवार, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि आता डॉ. अशोक करंजकर हे प्रशासकाच्या भूमिकेत आहेत.

महापौरांचे योगदान

स्व. शांतारामबापू वावरे हे महापालिकेचे प्रथम महापौर होते. प्रत्येक वॉर्डात शाळेची संकल्पना त्यांच्याच कार्यकाळापासून सुरू झाली. त्यानंतर महापौरपदी विराजमान झालेले (स्व.) पंडितराव खैरे यांनी नाशिककरांना गंगापूर धरण थेट पाइपलाइन, भूमिगत गटार योजना दिली. (स्व.) उत्तमराव ढिकले यांनी खतप्रकल्प, इंदिरा गांधी रुग्णालय, अभ्यासिका, अनंत कान्हेरे मैदानाची उभारणी केली. प्रकाश मते यांनी आदर्श घंटागाडी प्रकल्प, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, वसंत गिते यांनी दादासाहेब गायकवाड सभागृह, संभाजी स्टेडिअम, अशोक दिवे यांनी बुद्ध स्मारक, फाळके स्मारकाची पायाभरणी, शहरातील प्रवेशद्वारांची उभारणी, डॉ. शोभा बच्छाव यांनी फाळके स्मारकाची निर्मिती, जलकुंभ, गोदावरी नदीवर विविध पूल, दशरथ पाटील यांनी २००३ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, गोदावरीवर २३ पूल, गोदापार्क, थेट पाइपलाइन योजना, बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत स्वा. सावरकर स्मारक, कॉलेजरोड काँक्रिटीकरण, विनायक पांडे यांनी घरकुल योजना, पावसाळी गटार योजना, नयना घोलप-वालझाडे यांनी रस्ते विकास, नाशिकरोड विभागीय कार्यालय इमारत, ॲड. यतीन वाघ यांनी गोदापार्कचे पुनरुज्जीवन, रिंगरोड विकास, अशोक मुर्तडक यांनी २०१५ मधील सिंहस्थ नियोजन, कॉलनी अंतर्गत रस्ते, ठाकरे शस्त्रसंग्रहालय, बोटॅनिकल गार्डन, रंजना भानसी यांनी रस्तेविकास, तर सतीश कुलकर्णी यांनी रस्तेविकासासह मूलभूत सुविधानिर्मितीवर भर दिला.

स्मार्ट सिटीचा बोजवारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये देशभरात स्मार्ट सिटी अभियानाची घोषणा करण्यात आली. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात २०१६ मध्ये नाशिकची निवड करण्यात आली. स्मार्ट मिशनचा कालावधी पाच वर्षांचा होता. या अभियानांतर्गत हाती घेतलेली कामे जून २०२३ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ती झाली नसल्याने जून २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे; परंतु स्मार्ट सिटी अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या, कार्यवाहीत असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची एकूणच स्थिती बघता, स्मार्ट प्रकल्पांवर शेकडो कोटी रुपये खर्चूनही नाशिक शहर ‘स्मार्ट’ झालेच नाही.

या प्रकल्पांची नाशिककरांना प्रतीक्षाच

– देशातील पहिली टायरबेस निओ मेट्रो

– आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क

– गावठाण विकासासाठी क्लस्टर योजना

– नमामि गोदा, गोदावरीसह उपनद्यांची प्रदूषणमुक्ती

– मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ

– दारणा धरण थेट पाइपलाइन योजना

– अंतर्गत, मध्य बाह्यरिंगरोडचा पूर्ण क्षमतेने विकास

– दादासाहेब फाळके स्मारकाचा पुनर्विकास

– झोपडपट्टीमुक्त शहर, घरकुल योजनेची १०० टक्के अंमलबजावणी

– कचराकुंडीमुक्त शहर, कचरा विलगीकरण

हेही वाचा :

The post सांगा कधी होणार नाशिक स्मार्ट? चाळिशी उलटल्यानंतरही... appeared first on पुढारी.