सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे?

सांस्कृतिक कार्यक्रम www.pudhari.news

नाशिक: दीपिका वाघ

शहरात पहिल्यांदाच भारत रंग महोत्सव झाला. त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राज्य नाट्यच्या अंतिम फेरीला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. मराठी चित्रपटांसह शहरात आलेल्या सर्कस आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर हिट ठरलेल्या चित्रपटांनाही नाशकात रिकाम्या खुर्च्यांचा सामना करावा लागल्याने ‘नाटकच नाटक चोहीकडे, गेला प्रेक्षक कुणीकडे’ असे म्हणायची वेळ आली आहे.

शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, पण कोरोनामुळे घरी बसण्याची सवय झालेल्या रसिकांची पावले अजूनही नाट्यगृहांकडे वळायला तयार नाहीत असे दिसत आहे. शहरात गेल्या काही दिवसांत राज्य नाट्य स्पर्धा, भारत रंग महोत्सव, संस्कृत राज्य नाट्य स्पर्धा, राज्य बालनाट्य स्पर्धा, व्याख्यान, पुस्तक प्रकाशन, गझल, काव्य मैफली तसेच सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने घेतले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम, सर्कस असे अनेक उपक्रम पार पडत आहेत. पण, या कार्यक्रमांना रिकाम्या खुर्च्यांचा जास्त सामना करावा लागतो. आ. देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकमध्ये पहिल्यांदा राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी होणार असल्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करून जाहीर केले. त्यानंतर नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रेक्षक घडवण्याची गरज असल्याची खंत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी व्यक्त केली. तर जयप्रकाश जातेगावकरांनी नाटकाची वेळ चुकल्याचे मत मांडले. राज्य नाट्यच्या प्राथमिक फेरीत पारितोषिक पटकावलेली नाटके होती, पण नाटकांना प्रेक्षकवर्गच नव्हता. नाटक बघायला येणारी मोजकी मंडळी असतात. त्यातील नाटकाशी संबंधित असतात व बोटावर मोजण्याइतके नाटकप्रेमी. त्यात ये-जा करणारे जास्त. बाकी खुर्च्या रिकाम्याच. नाटक एक जिवंत कलाकृती असते. कलाकाराला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले, तर त्याचा अभिनय अधिक खुलतो. त्याला काम करण्याची स्फूर्ती मिळते. लेखकाने लिहिलेली भूमिका प्रेक्षकांसमोर मांडताना समोर प्रेक्षकच नसेल, तर? एके काळी रात्री 1 पर्यंत कालिदास कलामंदिरात नाटक हाउसफुल्ल करणारे नाशिककर रसिक कोठे गेलेत, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

प्रेक्षक झालाय चुझी..!
60 सेकंदांच्या रिलमध्ये 10 सेकंदांत बघण्याचा कंटाळा आला, तर आपण स्वाइप करून पुढे जातो. थोडक्यात प्रेक्षकांना आता काय आवडते हे जास्त महत्त्वाचे झाले आहे. रसिक प्रेक्षकांसमोर आता विविध पदार्थांनी भरलेली बाहुबली थाळी आहे. त्यातून कोणत्या पदार्थाची निवड करायची ते सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात आहे. कार्यक्रमात दम असेल, तर प्रेक्षकांची हमखास गर्दी होते, पण कार्यक्रमात तोच तोपणा येत असेल, तर प्रेक्षकवर्ग येणार तरी कुठून? शेवटी किती दिवस अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रसिक श्रोते ओलेचिंब आणि मंत्रमुग्ध होत राहणार आहेत, हा मोठा प्रश्न आहे.

वेगळेपण शोधण्याची गरज
स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर प्रेक्षकांना वेगवेगळे खाद्य पुरवावे लागते. मराठी सिनेमांना प्रेक्षक मिळत नसल्याची जी ओरड होते, त्याचे कारण प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून सिनेमे बनवले जात नाहीत. शाहरूखसारख्या स्टारला सतत सिनेमे फ्लॉप दिल्यानंतर काही काळाचा गॅप घ्यावा लागला. त्यानंतर ‘पठाण’ मधून त्याला दिलासा मिळाला. या उलट फारसे ओळखीचे नसलेल्या कलाकारांच्या सिरीज आणि सिनेमे ओटीटीवर हिट होताना दिसतात. त्याचे कारण त्यातील ‘वेगळेपण’ असते. हाच वेगळेपणा शोधण्याची गरज आता सांस्कृतिक कार्यक्रमांना आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रेक्षकवर्गच मिळत नसल्याने कार्यक्रम तासभर उशिरा सुरू होतात. तोपर्यंत कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्याला ताटकळत बसावे लागते. समोर प्रेक्षकच नसेल, तर सादरीकरण कुणासाठी करायचे? प्रत्येक कार्यक्रमाचा विशिष्ट श्रोता वर्ग असतो. तो डोळ्यासमोर ठेवूनच कार्यक्रमांचे आयोजन करावे लागते. सावानाचे 12 हजार वाचक सभासद आहेत. त्यातील 100 डोकीसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांना बघायला मिळत नाहीत. यामुळे आयोजकही बुचकळ्यात पडले आहेत.

हेही वाचा:

The post सांस्कृतिक कार्यक्रम चोहीकडे; गेला प्रेक्षक कुणीकडे? appeared first on पुढारी.