साईंचे दर्शन रात्री नऊपर्यंतच! शिर्डी संस्थानाकडून दर्शन, आरती व्यवस्थेत बदल

सिन्नर (जि. नाशिक) : कोरोनाचा नवीन स्ट्रेन, तसेच दुसऱ्या लाटेचे सूतोवाच राज्य शासनाकडून करण्यात आल्यानंतर नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साई मंदिरात दर्शन व आरती व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

भाविकांना दररोजच्या दर्शनाची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत राहणार आहेत. सकाळची काकड आरती व रात्रीच्या शेज आरतीसाठी भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, असे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सांगितले. 

दर्शन व आरती व्यवस्थेबाबत नव्याने नियोजन

देश-विदेशातील सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डी येथील साईबाबा मंदिर लॉकडाउन काळात बंद ठेवण्यात आले होते. १६ नोव्हेंबर २०२० पासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर आजपर्यंत १८ लाख ९२ हजार भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली असल्याचे संस्थांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कोरोना प्रतिबंधासाठी संस्थानकडून आदर्शवत व्यवस्था करण्यात आली असल्याने मंदिर उघडल्यापासून मंदिरातील कर्मचारी अथवा भाविकांना संसर्गापासून मुक्त ठेवण्यात यश आले आहे. मात्र, कोरोनाचा नवीन स्ट्रेन व दुसऱ्या लाटेचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दर्शन व आरती व्यवस्थेबाबत नव्याने नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार दैनंदिन दर्शनाची वेळ सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत असणार आहे. मुखदर्शन सुविधा कोविड मार्गदर्शक तत्त्वे अनुसरून सुरू ठेवण्यात येईल. प्रत्येक गुरुवारची पालखी मिरवणूकदेखील पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

भाविकांची दर्शनरांगेत  चाचणी
बायोमेट्रिक पास काउंटरवर होणाऱ्या गर्दीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन गुरुवार, शनिवार, रविवार, तसेच उत्सवाच्या दिवशी बायोमेट्रिक पास काउंटर बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, ऑनलाइन दर्शन पास व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. भाविकांची दर्शनरांगेत ढोबळ स्वरूपात चाचणी करण्यात येईल. दररोज म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी १५० व इतर दिवशी गुरुवारी, शनिवारी व रविवारी दोनशे चाचण्या घेण्यात येतील. त्यास भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.  

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले