Site icon

साईभक्तांसाठी आजपासून धावणार “वंदे भारत एक्स्प्रेस’, पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (दि.10)पासून मुंबई-शिर्डी दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू केली असून, या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

सध्या रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सर्व सुविधा देण्यासाठी विविध उपयोजना केल्या जात आहेत. एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस, मेट्रो नंतर आता ‘वंदे भारत’ ही वेगाने धावणारी गाडी सुरू करण्यात आली आहे. यानंतर देशात बुलेट ट्रेनदेखील लवकरच धावणार असल्याचे सांगितले जात आहे. वंदे मात‌रम‌् ही ट्रेन या आधी आठ ठिकाणी सुरू झाली आहे. मुंबई-सोलापूर नववी, तर मुंबई-शिर्डी साईनगर ही दहावी ‘वंदे भारत ट्रेन’ आहे. दहा फेब्रुवारीपासून आठवड्यात सहा दिवस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी साईनगर दरम्यान धावेल. दादर, ठाणे-नाशिकरोड या रेल्वेस्थानकावर गाडीला थांबा देण्यात आलेला आहे. मनमाडमार्गे जाणाऱ्या या गाडीला येथे मात्र केवळ मार्ग बदलण्यासाठी अवघ्या दोन मिनिटांचा थांबा आहे. त्यामुळे येथून या गाडीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भुसावळ विभागात मनमाड हे रेल्वेस्टेशन महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. येथून देशाच्या कानाकोपऱ्यातून रेल्वेगाड्या येतात. त्यामुळे साईबाबांचे दर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मनमाडला येतात. येथूनच ट्रेनसह टॅक्सी, एसटी बस, खासगी वाहनानेदेखील शिर्डीला जाता येते. त्यामुळे येथे गाडीला थांबा दिल्यास ‘वंदे भारत गाडी’ने येणाऱ्या भाविकांना आवश्यक्तेनुसार इतर वाहनांनी शिर्डीला जाता येऊ शकते. मात्र, येथे तिकीट दिले जाणार नसल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

मनमाडवासीयांची उपेक्षाच

मनमाडमार्गे धावणाऱ्या या गाडीचे मनमाड स्थानकावरून मात्र प्रवाशांना तिकीट मिळणार नाही. येथे केवळ मार्ग बदलण्यासाठी अवघ्या दोन मिनिटांचा गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त जात आहे. रेल्वे प्रशासनाने मनमाड येथूनही ‘वंदे भारत ट्रेन’चे तिकीट दिले तर प्रवाशांची सोय होण्याबराेबरच रेल्वेला उत्पन्नदेखील मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

The post साईभक्तांसाठी आजपासून धावणार "वंदे भारत एक्स्प्रेस', पंतप्रधान दाखविणार हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Exit mobile version