साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

दहीवेल अंगणवाडी प्रकल्प कार्यालय www.pudhari.news

पिंपळनेर, ता. साक्री, पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि साक्री तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दहीवेलच्या अंगणवाडी प्रकल्प कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत अंगणवाडी पतसंस्था चेअरमन संगीता तोरवणे आणि संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य तोरवणे यांना चर्चेसाठी आज सकाळी 10 वाजता धुळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आणि उपोषण थांबविण्यासाठी विनंती केली.

या बैठकीत प्रशासनाने खालील आश्वासन दिले:

  • अंगणवाडी पतसंस्थेची कपात वेळेवर न केल्याने झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई 10 दिवसाच्या आत केली जाईल.
  • चिक्की प्रकरणाची फेरचौकशी करण्यासाठी नवीन पुरावे दिल्यास कार्यवाही केली जाईल.
  • दहीवेल प्रकल्पातील बचतगट बिले हरवली असतील तर त्या नवीन तयार करून पैसे अदा केले जातील.
  • शिवाजीनगर (भामेर) येथील कार्यकर्तीला कामावर घेण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल.
  • प्रवास भत्ते आणि इतर विषयावर देखील चर्चा झाली आणि सकारात्मक निर्णय घेतले जाणार असल्याचे आश्वासन दिले गेले.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, अंगणवाडी पतसंस्था चेअरमन संगीता तोरवणे, संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र तोरवणे आणि दहीवेलच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कविता पाटील हे उपस्थित होते.

या आश्वासनांच्या आधारे अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेने आपले उपोषण स्थगित केले. परंतु, वरील मागण्या पूर्ण न झाल्यास 4 डिसेंबर पासून पुन्हा उपोषण सुरू केले जाईल, असे प्राचार्य तोरवणे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित appeared first on पुढारी.