साक्री रस्त्यावर बस-कंटेनरची धडक; दोन्ही वाहनांचे चालक जखमी 

वीरगाव (जि.नाशिक) : सटाणा ते ताहाराबाददरम्यान साक्री- शिर्डी महामार्गावर तरसाळी फाटा (ता. बागलाण) येथे गुरुवारी (ता.१७) सकाळी कंटेनर व बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

साक्री रस्त्यावर बस-कंटेनरची धडक 
सटाणा आगाराची सटाणा-नंदुरबार बस (एमइच ४० वाय ५०५४) सकाळी सातला प्रवासी घेऊन नंदुरबारकडे जात असताना तरसाळी फाट्यावर खड्डे टाळण्याच्या नादात समोरील कंटेनरवर (आरजे १४ जीजे ८५४०) जाऊन आदळली. यात ट्रकचालकाचा पाय मोडला असून, त्यास मालेगावला हलविले आहे. तर बसचालक मधुकर सोनवणे व वाहक अतुल कुमावत यांना मुकामार लागल्यामुळे त्यांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. 
संबंधित रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ‘एमएसआरडीसी’ कंपनीला काम दिले असून, काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे रोजच छोटे-मोठे अपघात होतात. काही दिवसांपूर्वीच या खड्ड्यांमुळे सात मजुरांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अन्य अपघातांत तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. खड्ड्यांमुळे रोजच होणाऱ्या अपघातात जीव गमावणाऱ्या वाहनचालकांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

कंपनीकडून नाममात्र डागडुजी 
काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने ‘साक्री-शिर्डी महामार्ग नव्हे, मृत्यू मार्ग’ अशा मथळ्याचे वृत्त छापल्यानंतर संबंधित कंपनीकडून नाममात्र डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. गुजरातला जोडणारा सर्वांत जवळचा रस्ता म्हणून या रस्त्याची खरी ओळख असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. संबंधित कंपनीने तत्काळ रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा