साखरपुडा अन् लग्नाचा बार उडविला धूमधडाक्यात! तीन वधूपित्यांना बसला चांगलाच फटका

सिन्नर (जि.नाशिक) : तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या वस्त्यांवर सुरू होते. एका ठिकाणी मंगलाष्टके होऊन वधू-वर विवाह बंधनात अडकले होते. दुसऱ्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता.अशातच तीन वधूपित्यांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

काय घडले नेमके?

तालुक्यातील दातली येथे मंगळवारी (ता. ६) एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी दोन लग्नसोहळे व एक साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. या तीनही ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक संख्येने उपस्थिती असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांना मिळाली. दातली येथील तीनही कार्यक्रमांची तपासणी करण्यासाठी नायब तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक दातली गावात धडकले. तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या वस्त्यांवर सुरू होते. एका ठिकाणी मंगलाष्टके होऊन वधू-वर विवाह बंधनात अडकले होते. दुसऱ्या ठिकाणी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. या दोन्ही ठिकाणी वधूपित्याने अनुक्रमे दहा हजार व पाच हजार रुपयांच्या दंडाची पावती देत वसुली केली. तिसऱ्या ठिकाणी मंगलाष्टकाची लगबग सुरू होती. त्या मुळे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वधू-वरांना अक्षदारूपी आशीर्वाद देणे पसंत केले.

वधूपिता व वरपित्याची भेट घेत आगमनाची वार्ता

मंगलाष्टक आटोपल्यावर वधूपिता व वरपित्याची भेट घेत आपल्या आगमनाची वार्ता दिली. भरारी पथक लग्नमंडपात हजर झाल्याचे पाहून वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धावपळ उडाली. अनेक पाहुणे न जेवताच आपल्या वाहनातून रवाना झाले. स्थानिकांनीही दिसेल त्या रस्त्याने धूम ठोकली. या ठिकाणी देखील दहा हजारांचा आहेर सरकारी तिजोरीत जमा करून घेत पथक पुढच्या मोहिमेवर निघाले. अव्वल कारकून दत्ता सोनवणे, पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ, महसूल सहाय्यक राजेंद्र खडताळे, मुरलीधर चौरे या कारवाईत सहभागी झाले होते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून संबंधित कुटुंबांना पन्नास लोकांच्या मर्यादित उपस्थिती कार्यक्रम करावा, अशी सूचना केली होती. मात्र त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा सुरू होती. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

या यजमानांनी भरला दंड 
दातली येथील तिघांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. खंडू आव्हाड यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. साखरपुड्यात लग्न उरकून घेण्याचे नियोजन करणाऱ्या म्हाळू भाबड यांना पाच हजारांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. साखरपुड्याचा कार्यक्रम करणारे रामदास भाबड यांना दहा हजारांचा दंड सरकारी खजिन्यात जमा करावा लागला. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

७० पेक्षा अधिक पाहुण्यांची उपस्थिती असल्याने कारवाई

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लग्नसमारंभ व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उपस्थितीची मर्यादा घालून दिली आहे. या नियमावलीकडे दुर्लक्ष करून परवानगीशिवाय साखरपुडा व लग्नसोहळ्याचे तीन कार्यक्रम सिन्नर तालुक्यातील दातली येथे धूमधडाक्यात सुरू होते. ही बाब समजल्यानंतर तहसीलदारांच्या भरारी पथकाने थेट लग्नमंडप गाठत दोन वधूपित्यांना प्रत्येकी दहा हजार, तर साखरपुड्याच्या कार्यक्रमात एका वधूपित्यास पाच हजारांचा दंड ठोठावला. तिन्ही कार्यक्रमांत ७० पेक्षा अधिक पाहुण्यांची उपस्थिती असल्याने ही कारवाई करण्यात आली. 

Associated Media Ids : WVI21B00559