सातपूरचा अतिक्रमण विभाग हप्तेखोरीसाठी कार्यरत; प्रभाग बैठकीत नगरसेवकाचा थेट आरोप 

सातपूर (जि.नाशिक) : सातपूर विभागात ठिकठिकाणी अतिक्रमणाचा अजगरी विळखा पडत असून, त्याचे सोयरेसुतक नसलेला सातपूरचा अतिक्रमण विभाग केवळ चिरीमिरी व हप्तेखोरीसाठी कार्यरत असल्याचा थेट आरोप नगरसेवक भागवत आरोटे यांनी प्रभाग बैठकीत केला. 

सातपूरचा अतिक्रमण विभाग हप्तेखोरीसाठी कार्यरत 
सातपूर येथील महापालिका कर्मचारी मोईन खान व माजी नगरसेविका सुवर्णा मोराडे यांच्या सासू छबाबाई मोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करत पाच मिनिटे तहकूब केलेली बैठक प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १७) झाली. या वेळी प्रभाग २६ मध्ये उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांची संख्या वाढली असून, अधिकारी याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. सरार्सपणे उघड्यावर मांसविक्री व मोठ्या जनावरांचा कत्तलखाना सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

प्रभाग बैठकीत नगरसेवक आरोटेंचा थेट आरोप 

उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आरोटे यांनी केली. प्रभागात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक दहशतीखाली असून, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी योगेश शेवरे यांनी केली. नगरसेविका दीक्षा लोंढे, नयना गांगुर्डे, समिती सदस्य विजय भंदुरे यांनी समस्या मांडत अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. बैठकीत धूरफवारणी ठेकेदाराच्या अटी-शर्तींची विचारणा केली असता अधिकाऱ्यांना उत्तर न देता आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ठेका रद्द करण्याची मागणी केली.  

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..