सातपूर-अंबड बनले देशी-विदेशी हत्यारांचा अड्डा; पोलिसांची डोकेदुखी वाढली 

सातपूर (नाशिक) : अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरीची प्रचंड क्रेज वाढली आहे. भाईगिरीच्या नादात अल्पवयीन मुले बळी पडत आहेत. येथे गोळीबार करून रोहित नागरे याच्या आत्महत्येचे प्रकरण वरवर वाटत असले, तरी देशी कट्टा आला कुठून, हा प्रश्‍न पोलिसांना विचार करायला लावणारा आहे. या घटनेमुळे सातपूर, अंबड परिसर देशी-विदेशी हत्यारांचे अड्डा बनला काय, अशी भीती नागरिकांना वाढू लागली आहे. 

देशी-विदेशी हत्यारांचे अड्डा बनला

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कामगार लोकवस्तीत अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सातपूरमधील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात चाकू, सुरी, गुप्ती, फायटर आदी धारधार शास्त्र आढळून आल्याच्या घटना यापूर्वी  समोर आल्या आहेत. यामुळे किरकोळ कारणावरून हाणामारी व गुंडगिरी वाढली आहे. याबाबत पोलिसांतर्फे शाळा, महाविद्यालयांत जनजागृती केली जात असली, तरी या मुलांवर डोळा ठेवून असलेले सफेद कपड्यातील काही जण या मुलांना व्यसनाधिन बनवून पाहिजे ते गुन्हेगारीचे काम करून घेत आहेत. असाच प्रकार संतोष आघाम व त्याच्या मित्रांमध्ये भाईगिरीवरून भांडण होऊन एकमेकांच्या वर्चस्वावरून संतोषचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्य संशयित हृषीकेश गोरे बरोबर इतर दोन संशयित अल्पवयीन  होते. तसाच काहीसा प्रकार सातपूर-अंबड लिंक रोडवर घडला. मंगलसिग माझी हा परप्रांतीय तरुण आपल्या मित्रांना देशी-विदेशी कट्टा दाखवत असतानाच एकाने माझीवर गोळीबार केला व फरारी झाला. त्याचा आजही पोलिस तपास करीत आहेत. 

पोलिस कडक पावले उचलतील, 
मुळचा आजमगडचा (उत्तर प्रदेश) असलेला नंदन जयस्वाल याने सप्टेंबर २०१७ मध्ये श्रमिकनगरमधील सातमाउली चौकात दुपारी गोळीबार केल्याने फिर्यादी थोडक्यात बचावला होता. गोळीबार करून नंदन आजमगडला फरारी झाला होता. नगरसेवक दिनकर पाटील यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले व संशयिताला अटक करण्याची मागणी केली होती. नागरिकांनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांवर दबाव वाढविला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे व सहाय्यक निरीक्षक संदीप वराडे, उपनिरीक्षक शांताराम चव्हाण यांनी संशयित नंदन जयस्वाल याला आजमगडवरून अटक केली होती. हा खटला न्यायालयात सुरू असताना, फिर्यादीने अचानक माघार घेतल्याने सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासवर पाणी फिरले होते. या सर्व घडामोडी पाहता सातपूर, अंबड देशी- विदेशी हत्यारांचा अड्डा बनला की काय, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. यावर पोलिस कडक पावले उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.
पोलिसांची डोकेदुखी वाढली 
अशोकनगर भाजी मंडईपासून ते नागरे चौक, श्रीकृष्ण मंदिर चौक, राधाकृष्णनगर, पिंपळगाव बहुला,  श्रमिकनगर आदी भागांत यापूर्वी मोहिते, जाधव, आव्हाड, अमोल बागले, विटकर आदींसह अनेक खून झाले असून, भाईगिरी, एकमेकांचे वर्चस्व, अवैध व्यवसाय व त्यातून होणारे वाद हे मुख्य कारण आहे. यातील अनेक फिर्यादी संबंधिताना मॅनेज झाल्यामुळे व न्यायालयात  साक्षीदांरानी साक्ष फिरवल्यामुळे काही अल्पवयीन असल्याचा फायदा झाल्यामुळे पोलिसांची मेहनत वाया गेली. आजमितीला अनेक  गुन्हेगार निर्दोष सुटले असून, मोकाट फिरत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.  

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह