साथरुग्णांची माहिती दडविणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हा

स्वाईन फ्लू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- स्वाईन फ्लू, डेंग्यू सारख्या साथरुग्णांची माहिती दडविणाऱ्या खासगी रुग्णालयांवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला आहे. शहर-जिल्ह्यात स्वाईन फ्लू, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना खासगी रुग्णालयांकडून दाखल रुग्णांची माहिती महापालिकेला कळविली जात नसल्यामुळे प्रशासनाने हा पवित्रा घेतला आहे.

बदलत्या वातावरणात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात जानेवारी ते एप्रील या चार महिन्यात स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामिण भागातही १८ रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे गेल्या महिनाभरातच सहा जणांचा बळी गेला आहे. त्यात नाशिक शहरातील एका डॉक्टरचा तर, ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये या सर्व रुग्णांवर उपचार सुरू होते. स्वाईन फ्लू, डेंग्यू सारख्या साथ रोगांच्या आजारांची लागण झालेले रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांवर बंधनकारक आहे. यासंदर्भात वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व ६५० रुग्णालयांना एप्रिलमध्ये सूचनापत्र देत साथरूग्णांची माहिती कळविण्याबाबत सूचित केले होते. मात्र त्यानंतरही खासगी रुग्णालयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यू सारख्या साथरोगाची लागण झालेल्या रुग्णाची माहिती दडविल्याचे निदर्शनास आल्यास अशा खासगी रुग्णालयांविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

असा आहे कायदा..!

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम १८८नुसार साथरोगाची माहिती लपविण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नॅशनल इंटिग्रेटेडे मेडिकल असोसिएशन (निमा), प्रायव्हेट मेडिकल असोसिएशन (पीएमए), फॅमिली प्रॅक्टिशनर असोसिएशन (एफपीए), सातपूर-अंबड डॉक्टर्स असोसिएशन (एसएडीए), जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जीपीए) या संघटनांना पत्राद्वारे सुचित केले आहे.

हेही वाचा –