सापडेल तोच गुन्हेगार, न सापडणारे मोकाट! रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गर्दी कायम

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले असले, तरी बाजारात मात्र हे सगळे उपाय तोकडे ठरत आहेत. भाजीबाजारापासून तर रस्त्यावरील गर्दीत नागरिकांमध्ये भीतीचे 
वातावरण जाणवत नाही. त्यामुळे विनामास्क सापडले तो गुन्हेगार आणि त्यालाच दंड न सपाडणारे बाकीचे सगळे मोकाट असे सार्वत्रिक चित्र आहे. 

रस्त्यांवर गर्दी कायम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अंमलबजावणीसाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणांवरील मर्यादाही पुढे येत आहे. सार्वजनिक सोहळ्यांवर निर्बंध आणल्याने विवाह सोहळ्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. मात्र बहुतांश विवाहांसाठी यापूर्वीच निमंत्रणे दिलेली असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमातील गर्दी नियंत्रित करताना आयोजकांची अडचण होत आहे. रस्त्यावरील बाजारात हेच चित्र आहे. नाशिकला भाजीबाजाराच्या इमारती कमी असल्याने जवळपास सगळे मोठे भाजी बाजार रस्त्यावरच भरतात. त्यामुळे सायंकाळी नियमितपणे भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी कायम आहे. महापालिका यंत्रणेकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया सुरू आहेत. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सापडेल तोच गुन्हेगार 

वर्षभर लॉकडाउनमध्ये आर्थिकदृष्ट्या भरडले गेलेले आणि हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांना रोजगाराची भ्रांत आहे. दुकान बंद ठेवण्याची त्यांची अजिबात मानसिकता नाही. त्यामुळे जुजबी उपाययोजना आखून त्यांनी व्यवसाय मांडले आहेत. गर्दी होवो न होवो त्यांचे व्यवसाय मात्र सुरू आहेत. अंमलबजावणी करणाऱ्या पोलिस आणि महापालिका यंत्रणांनी रस्त्यावर दंड आकारणी सुरू केली असली तरी त्यावर मर्यादा आहेत. तासाला शेकडो आणि हजारोंनी वाहने धावतात दंड भरणाऱ्यांची संख्या दोन आकडीही नाही. अशा परिस्थितीमुळे सध्या दंड आकारणी पथकाला विनामास्क सापडेल तोच गुन्हेगार, असेच शहरातील चित्र आहे. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले