सामनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

सामनगांव (नाशिक) : येथील विरोबा मंदिर परिसरातील ढोकणे वस्तीत बिबटयाने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची पुन्हा झोप उडवली आहे. बुधवारी (ता. 27) रात्री 8.30 च्या सुमारास बिबटयाच्या हल्ल्यात वासरू ठार झाल्याने परिसरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.

अशी आहे घटना

सामनगांव शिवारातील जितेंद्र रघुनाथ ढोकणे यांच्या शेतात गोठ्याबाहेर बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. त्यावेळी वासराच्या हंबरण्याने ढोकणे, दत्तू जगताप, जालिंदर ढोकणे, मंगेश ढोकणे हे लाठ्या काठ्या घेऊन आवाज करीत पळत आले. तोवर बिबट्या आपला कार्यभार उरकून पसार झाला. गेल्या वर्ष दोन वर्षांपासून परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यात बिबट्याने गावचे पोलीस पाटील बबन जगताप यांच्या नातवावर हल्ला केला होता, त्यात सुदैवाने तो बचावला होता. तर दत्तू जगताप यांच्या वासरावर हल्ला, धनाजी ढोकणे यांच्या घोड्यावर हल्ला असे अनेक हल्ल्यात येथील शेतकऱ्यांचे वासरू, घोडा मृत्युमुखी पडले.   

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

गेल्या वर्षी या परिसरात चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु काल घडलेल्या या घटनेने परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल