सामुदायिक विवाह सोहळा पडला महागात; मालेगावात काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घतले आहे. राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत व या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याच्याा सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येत आहेत. या दरम्यान कोरोना संसर्ग वाढत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून शहरातील कमालपुरा भागात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केल्याचा प्रकार घडला आहे. 

काँग्रेस नगरसेवक फारूक फैजुल्ला यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मोठी गर्दी झाल्याने त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या धडक कारवाई पथकाने गुन्हा दाखल करतानाच त्यांच्याविरुद्ध एक हजार रुपये दंडाची कारवाई केल्याचे उपायुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी पाचशेहून अधिक नागरिकांची गर्दी जमा झाली होती. भव्य मंडप टाकण्यात आला होता. विवाह सोहळ्यास सहभागी झालेल्या अनेकांनी मास्कदेखील लावलेले नव्हते. सॅनिटायझरचा पत्ताच नव्हता. मनपा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत दंड व गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.  

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन