सायबर फसवणुकीत कोटींची उड्डाणे! कोरोनाकाळात सुमारे दोन कोटींची लूट 

नाशिक : गेल्‍या वर्षी मार्चपासूनच कोरोनाने आपले पाय पसरल्‍याने लॉकडाउन व नंतर मंदावलेल्या बाजारपेठेतील, नोकरदारांच्या पगारात झालेली कपात यामुळे अर्थचक्र मंदावलेले होते. पण दुसरीकडे गेल्या वर्षी सायबर गुन्‍हेगार मात्र फसवणुकीचा सपाटा लावत कोरोनाच्‍या धास्‍तीने घरी बसलेल्‍या नागरिकांच्‍या पैशां‍यांवर नानाविध प्रकारे डल्‍ला मारत होते. यातून २०२० मध्ये जानेवारी ते डिसेंबरदरम्‍यान नाशिकच्‍या सायबर पोलिस ठाण्यात ४० तक्रारी दाखल झाल्‍या आहेत. यातून तब्‍बल एक कोटी ९० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. यात आधारकार्ड केवायसीच्‍या नावाखाली झालेल्‍या फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

कोरोनाकाळात डिजिटल माध्यमांतून सुमारे दोन कोटींची लूट 
कोरोना काळात इंटरनेटचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला. प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर उपलब्ध असली तरी इंटरनेटचा उपयोग करताना अ‍ॅप, संकेतस्थळ सुरक्षित आहे, का याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. खबरदारी न घेतल्यामुळे सायबर चोरटे याचा फायदा घेऊन कोट्यवधींची फसवणूक करीत आहेत. वर्षभरात आधारकार्ड अपडेटच्या सर्वाधिक आठ, गाडी खरेदी व कॅशबॅक रिवॉर्ड पॉइंटच्या प्रत्येकी पाच, सोशल मीडियावर मैत्रीच्या तीन, ओटीपी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड पडताळणी तीन, तेलबिया हर्बल ऑइल असा नायजेरियन फ्रॉड देशात समोर आला होता. त्यात शहरात दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात ५० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे दिसते. नोकरी लावून देतो या बहाण्याने दोन तक्रारी असून, त्यातून जवळपास नऊ लाखांची फसवणूक झाली आहे. मोबाईल कंपनीचे टॉवर लावून देतो या बहाण्याने तीन लाख १५ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली आहे.

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

सायबर फसवणुकीत कोटींची उड्डाणे!

रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅपच्या तीन तक्रारी सायबर सेलकडे आल्या असून, त्यातून १२ लाख २० हजारांचा गंडा सायबर चोरट्यांनी घातला आहे. यातील काही तक्रारदारांच्या रकमा परत करण्यात सायबर सेलला यश आले आहे. दरम्यान, छोट्या रकमेची फसवणूक झाली असेल तर नागरिक तक्रारी करत नसल्याने सायबर चोरट्यांचे फावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी समोर यावे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे. 

सोशल माध्यमाचा वापर करताना तांत्रिक खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी. कोणताही व्यवहार करताना पिन, ओटीपी शेअर करू नका. क्यूआर कोड स्कॅन करण्याचे प्रमाण वाढले असून, खबरदारी घ्यावी तसेच कोणतीही लिंक ओपन करू नये. फेक कॉल, अफवांना बळी पडू नये. -श्रीपाद परोपकारी, पोलिस निरीक्षक, सायबर सेल 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

फूड डिलिव्हरीमधूनही गंडा 
कोरोनाकाळात शहरात ऑनलाइन अ‍ॅपद्वारे घरबसल्या जेवण मागविण्याचे प्रमाणही वाढले आहे. फूड डिलिव्हरी अ‍ॅपमधून नाशिक शहरात गेल्या वर्षी एक तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाली असून, त्यातून ९९ हजार ७५६ रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फूड डिलिव्हरी अ‍ॅप वापरताना ही काळजी घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे. 

कशात झाली फसवणूक? 
रिवॉर्ड, कॅशबॅकच्या बहाणा, ऑनलाइन गेमिंग अ‍ॅप, नोकरी देण्याचे आमिष, बँक रिवॉर्ड, डेबिट, क्रेडिट कार्ड, आधारकार्ड अपडेट, मोबाईल टॉवर, शेअर गुंतवणूक, रिमोट अ‍ॅक्सेस अ‍ॅप, तेलबियांचा व्यवसाय, गाडी खरेदी, सोशल मीडियावर मैत्री.