सायबर सुरक्षिततेसाठी ‘सॉक’ची गरज; मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर चर्चेला तोंड

नाशिक : मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यामागे चीनमधील हॅकर्सचा सहभाग असल्‍याच्‍या चर्चेला तोंड फुटले असून, या पार्श्वभूमीवर सरकारी विभागाच्‍या सायबर सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आलाय. केवळ आर्थिकविषयक आस्‍थापनांमध्येच नाही तर प्रत्‍येक आस्‍थापना, विभागात सायबरहल्ल्‍यांना वेळीच प्रतिबंध करण्याची प्रणाली ही काळाची गरज बनली आहे. रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियातर्फे बँकांमध्ये सिक्‍युरिटी ऑपरेशन सेंटर (सॉक) आवश्‍यक केले असून, या धर्तीवर शासकीय विभागांसह मोठ्या खासगी कंपन्‍यांच्‍या विभाग, आस्‍थापनांमध्ये सॉकची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. 

चिनी हॅकर्समुळे ही घटना घडल्‍याचा दावा

मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्‍याचा विषय सध्या आंतरराष्ट्रीय स्‍तरावर चर्चेचा ठरला आहे. अमेरिकेतील कंपनीतर्फे अहवाल सादर करताना चिनी हॅकर्समुळे ही घटना घडल्‍याचा दावा केला आहे. या संदर्भात ‘सकाळ’तर्फे या क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्‍यूशन प्रा.लि. संस्‍थापक व सीएमडी पीयूष सोमानी यांच्‍याशी संवाद साधला. या वेळी श्री. सोमानी म्‍हणाले, की स्‍मार्ट शहरांकडे वाटचाल करताना आगामी काही वर्षांत सर्व सेवा, सुविधा या सॉफ्टवेअरशी संलग्‍न होणार आहेत व मानवीय प्रणालीचे प्रमाण घटत जाणार आहे; परंतु प्रत्‍येक तंत्रज्ञानाला निर्धारित आयुष्य असते व काळानुरूप अद्यावतीकरण आवश्‍यक ठरते. परंतु भारतात संगणकापासून अन्‍य बाबींमध्ये वर्षानुवर्षे कालबाह्य प्रणाली झालेली असतानाही वापर सुरूच असतो.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

कार्यालये व मोठ्या कंपन्‍यांमध्ये ही प्रणाली आवश्‍यक

आर्थिक बचत करणे हा त्‍यामागील महत्त्वाचा उद्देश असून, काही वेळा पुरेसे ज्ञान नसते. अशा परिस्‍थितीत कालबाह्य झालेल्या प्रणालीवर हल्‍ला करणे हॅकर्ससाठी अत्‍यंत सोपे व सुलभ होऊन जाते. मग एखाद्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्याला हेरून त्‍याच्‍या ई-मेलद्वारे कार्यालयीन संगणकावर व्‍हायरसचा हल्‍ला करत संपूर्ण नियंत्रण मिळविले जाते व या दुर्लक्षामुळे कार्यालयीन प्रणालीवर हॅकर्स ताबा मिळवितात. याद्वारे कार्यालयीन व्‍यवस्‍थेचा गैरवापर करू शकतात. त्‍यामुळे वेळीच यंत्रणेचे अद्ययावतीकरण केले पाहिजे. आरबीआयमार्फत बँकांना कोअर बँकिंग सुविधा प्रदान करताना सिक्‍युरिटी ऑपरेशन सेंटर (सॉक) प्रणाली आवश्यक केलेली आहे. या धर्तीवर प्रामुख्याने सर्व शासकीय कार्यालये व मोठ्या कंपन्‍यांमध्ये ही प्रणाली आवश्‍यक असल्‍याचे म्‍हटले आहे. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

असे काम करते सॉक 
सिक्‍युरिटी ऑपरेशन सेंटरद्वारे संबंधित आस्‍थापनेच्‍या सर्व्हरवर लक्ष ठेवण्यासाठीची व्‍यवस्‍था केलेली आहे. याअंतर्गत मोठ्या स्‍क्रीनला हे सर्व्‍हर जोडलेले असते. कुठल्‍याही स्‍वरूपाचा सायबरहल्‍ला, तांत्रिक बिघाड आदीसंदर्भातील माहिती या केंद्रात कार्यरत तज्‍ज्ञांच्‍या निदर्शनात येते व ते वेळीच उपाययोजनांना सुरवात करतात. काही बिघाडांवर उपाय म्‍हणून पर्याय हे संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्‍ध असतात, तर अन्‍य काही गुंतागुंतीच्‍या समस्‍यांवर मानवीय पद्धतीने तोडगा काढता येऊ शकतो. 
--- 
मोठ्या बँका, एनबीएफसी यांच्‍यासह अन्‍य विविध आस्‍थापनांमध्ये यापूर्वीच सिक्‍युरिटी ऑपरेशन सेंटरचा वापर होऊ लागला आहे; परंतु एकंदरीत विचार करता खूप कमी विभागांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर होतो. परंतु या प्रणालीमुळे मोठ्या बँकांवरील हल्‍ले फेटाळून लावण्यात आम्‍हाला यश आलेले आहे. सर्व्हिस मॉडेलद्वारे सेवेचा लाभ घेण्याचा पर्यायदेखील उपलब्‍ध आहे. 
-पीयूष सोमानी, संस्‍थापक, ईएसडीएस कंपनी