सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन पडलं महागात! ‘बर्थडे बॉय’सह १५ जणांवर गुन्हा 

जुने नाशिक : सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह १५ जणांवार भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे त्यांच्या अंगाशी आले.

शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भागात सार्वजनिक ठिकाणी काही जण वाढदिवस साजरा करीत होते. भद्रकाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता, काहींनी पळ काढला. बर्थडे बॉय दीपक भाऊसाहेब गांगुर्डे यासह आठ जण त्या ठिकाणी आढळले. याबाबत हवालदार ललित केदार यांच्या तक्रारीवरून बर्थडे बॉयसह विक्रम गायकवाड, स्वप्नील पाटील, विक्री कदम, हेमंत सोनवणे, आदित्य पोले, कैलास बावस्कर, विशाल परदेशी यांच्यासह अन्य सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कोरोना प्रादुर्भावामुळे पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी लागू केली आहे. त्या आदेशाचे उल्लंघन केले जात होते. वाढदिवस साजरा करणाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सही नव्हते. शिवाय कुणी मास्कही न लावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..