साल्हेरला साकारणार भव्य शिवसृष्टी! आमदार दिलीप बोरसे यांच्याकडून परिसराची पाहणी

तापूर (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील शिवशाहीचा साक्षीदार साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी लवकरच शंभर एकर परिसरात भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी निर्माणकार्याला प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी साल्हेर येथून केली. 

सुरतेवर छापा टाकून आल्यानंतर प्रथमच छत्रपती शिवरायांनी बागलाणच्या साल्हेर किल्ल्याच्या मैदानावर लढाई जिंकून साल्हेर ताब्यात घेतला होता. या लढाईत शिवरायांचे बालपणचे मित्र सूर्याजी काकडे शहीद झाले होते. सर्वाधिक उंच किल्ला आणि शिवरायांची मैदानावरची एकमेव लढाई असल्यामुळे राज्यातील किल्ल्यांपैकी साल्हेरचे वैशिष्ट्य आहे. यामुळे साल्हेर किल्ल्याला शिवशाहीचा साक्षीदार म्हणून संबोधले जाते. म्हणूनच छत्रपतींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी याच मैदानावर आपण महाराजांचे स्मारक व शिवसृष्टी उभारण्याची कल्पना साकारणार असल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले. आमदार बोरसे यांनी शनिवारी (ता. ६) दिवसभर किल्ला परिसराची पाहणी केली. 

साल्हेरच्या गणपती घाट परिसरात असलेल्या तीनशे एकर जागेपैकी पहिल्या टप्प्यात १०० एकर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येईल, अशी घोषणा करून जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रकल्प उभारण्यासाठी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष किशोर भामरे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश आमदार बोरसे यांच्याकडे जमा करून शिवप्रेमी भाऊसाहेब अहिरे, यतीन पगार यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. आमदार बोरसे यांनी शिवस्मारकाच्या घोषणेच्या पहिल्याच दिवशी ११ लाख रुपयांची मदत गोळा झाली. 

कसा असेल शिवस्मारक प्रकल्प 

शंभर एकर परिसरात उंच प्रशस्त चौथऱ्यावर छत्रपती शिवरायांचा ब्राँझ धातूचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. त्यांच्या जीवनावर महती, लहान-थोर, आबालवृद्धांपर्यंत पोचविण्यासाठी शिवसृष्टी निर्माण केली जाणार आहे. शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचे म्युरल्स उभारण्यात येऊन ऐतिहासिक घटनांचे पेंटिंग रेखाटण्यात येणार आहे. म्युझियमचे बांधकाम केले जाणार आहे. ५० व्यक्ती बसू शकतील अशा क्षमतेचे लहान चित्रपटगृह उभारून महाराजांवरील जीवनपट दाखविले जाणार आहेत. किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे दगडी संरक्षण भिंत, किल्ल्याच्या दरवाजाप्रमाणे भव्य प्रवेशद्वार, ठिकठिकाणी अर्धवर्तुळाकार बुरूज, चौकीदार कक्ष, महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांच्या प्रतिकृती संग्रहालयदेखील निर्माण करण्यात येणार आहे. शिवसृष्टी परिसरात अंतर्गत सौंदर्यीकरण, ऐतिहासिक, प्रसिद्ध व्यक्तींचे किंवा घटनांचे, युद्धांच्या प्रसंगाचे लहान पुतळे तयार करणे, सौर प्रकल्प उभारणे, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण योजना, भूमिगत गटारी, स्वच्छतागृह, म्युझिकल कारंजे, प्रशस्त वाहनतळ, साल्हेर किल्ल्याच्या दर्शनासाठी रोपवेची निर्मिती, साल्हेर परिसरातील गुजरातकडे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधून तलाव करणे, पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा, पर्यटकांच्या मुक्कामाच्या सोयीसाठी दोनमजली इमारत, गार्डनची निर्मिती करून त्यात ग्रीन जिम तयार करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

व्ह्यू पॉइंट उभारणार 

गुजरातकडील खोल दरीच्या बाजूस कठडे बांधून व्ह्यू पॉइंटची निर्मिती केली जाणार आहे. गणपती व भवानी मंदिरांचा विकासदेखील करण्यात येणार असून, स्थानिक नागरिकांना रोजगारनिर्मितीसाठी व्यापारी संकुल बांधून ऐतिहासिक पुस्तके विक्री केंद्र, ऐतिहासिक मूर्ती, भित्तिचित्रे, पुतळे विक्री केंद्र, हॉटेल, दुकाने उभारण्यात येणार आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कायमस्वरूपी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

आमदार दिलीप बोरसे यांना टेंभे खालचे (ता. बागलाण) येथील शिवमुद्रा ग्रुपतर्फे शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी ‘छत्रपती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी साल्हेर येथील ऐतिहासिक किल्ल्याजवळ शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक लवकरच तयार करण्याबाबत जाहीर केले होते. 
-भाऊसाहेब अहिरे, संस्थापक अध्यक्ष, शिवमुद्रा ग्रुप, टेंभे (खा.) 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

साल्हेर किल्ला परिसरात होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकामुळे साडेतीनशे वर्षांच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळणार आहे. हे स्मारक महाराष्ट्रासह देश व परदेशात प्रसिद्ध होऊन महाराजांचा इतिहास चिरकाल जिवंत राहण्यास मदत होणार आहे. या परिसराच्या विकासाला निश्‍चित चालना मिळणार आहे. 
-बिंदूशेठ शर्मा, शेतकरीमित्र