सावधान! मार्च प्रारंभी कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची चिन्हे; गर्दीचा उच्चांक अडचणीचा 

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी, घरगुती सोहळ्यांमधील गर्दीच्या वाढत्या उच्चांकामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवजयंती कार्यक्रमांमधील सहभागानंतर बुधवारपासून (ता.२४) रुग्णांची संख्या वाढणार की घटणार, याचा ‘वॉच’ आरोग्य यंत्रणेतर्फे सुरू करण्यात आला होता. दोन दिवसांत रुग्णांच्या वाढलेल्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर पाच दिवसांत दिवसाची रुग्णसंख्या हजारापर्यंत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यानंतर काय? 
पुढील महिन्याच्या सुरवातीच्या तीन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या एक हजारापर्यंत पोचण्याची चिन्हे दिसत असताना त्यानंतर काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मार्चमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला यंत्रणेला सामोरे जावे लागणार आहे. तीन मार्चनंतर दिवसाची रुग्णसंख्या पाचशेच्या पुढे राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांना वाटत आहे.  

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

मनुष्यबळाला परत केंद्रात आणण्याची व्यवस्था

कोरोना चाचणीतून दिवसभरात आढळलेल्या रुग्णांपैकी ३६६ नाशिकमधील, १६२ ग्रामीणमधील, ५३ मालेगावमधील आहेत. तसेच सद्यःस्थितीत ५५० रुग्ण उपचार घेताहेत. त्यात नाशिक तालुक्यातील ७९, बागलाणमधील २६, चांदवडमधील २१, देवळ्यातील १३, दिंडोरीतील ४४, इगतपुरीमधील १५, कळवणमधील १४, मालेगावमधील ४०, नांदगावमधील ७६, निफाडमधील १०८, सिन्नरमधील ६७, सुरगाण्यातील पाच, त्र्यंबकेश्‍वरमधील २०, येवल्यातील २२ रुग्णांचा समावेश आहे. ही स्थिती पाहता, ग्रामीणमध्ये ऑक्सिजन खाटा आणि कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याची स्थिती तयार झाली आहे. जिल्ह्यातील १४ कोरोना केअर सेंटरसाठी ३५० खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रांचे मनुष्यबळ पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठवण्यात आले होते. या मनुष्यबळाला परत केंद्रात आणण्याची व्यवस्था आरोग्य यंत्रणेला करावी लागणार आहे. या केंद्रांमधून सद्यःस्थितीत सिन्नरमध्ये पाच पॉझिटिव्ह आणि तीन संशयित, पिंपळगावमध्ये सात पॉझिटिव्ह असे १५ रुग्ण उपचार घेताहेत. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

ऑक्सिजनवर ३२ रुग्ण 
डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरची जिल्ह्यातील संख्या १७ असून, त्यामध्ये ३४० खाटांची व्यवस्था आहे. त्यामधून ७५ पॉझिटिव्ह आणि १६ संशयित असे ९१ रुग्ण उपचार घेताहेत. त्यातील ३२ रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागली आहे. केंद्रांमध्ये दाखल रुग्णांची आणि ऑक्सिजनचा उपयोग करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या अनुक्रमे अशी ः सिन्नर-९-४, येवला-१२-२, कळवण-२-१, देवळाली-७-३, दिंडोरी-९-०, निफाड-१०-४, चांदवड-८-४, बागलाण-२-१, सिन्नर-५-१, नांदगाव-११-१०. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, निफाड अव्वलस्थानी पोचला असून निफाडमध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्याखालोखाल नाशिक, नांदगाव, सिन्नर, दिंडोरी तालुक्यातील आरोग्य सुविधा पुन्हा पूर्वपदावर वेगाने आणाव्या लागणार आहेत.