सावधान! मुंबई-नाशिक महामार्गावरुन प्रवास करताहेत? मग काळजी घ्यावीच लागणार

घोटी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील अर्धवट कामांमुळे जागोजागी महामार्गाची वाताहत झाली असून, दिवसागणिक अपघात वाढत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने महामार्गावरील विविध अपघातांच्या आधारे ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित केले आहेत. मात्र परिसरातील दिशादर्शक बोर्ड, दुभाजक, संरक्षक कठडे, गतिरोधक नामशेष, तर काही कुमकुवत झाले आहेत. त्यामुळे महामार्गावरील चौफुल्या हे अपघातांचे साफळे झाले आहेत.

महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे गैरसोय

उड्डाणपुलावरील हायमास्ट बंद पडले आहेत. टोलवसुली जोरात सुरू आहे; पण पुलावर नागरिक व वाहनधारकांसाठी असलेल्या सुविधांचा मात्र विसर पडला आहे. नियमितपणे टोलमध्ये वाढ होत असताना मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक सुविधा अर्धवट व तुटपुंज्या स्वरूपाच्या आहेत. कसारा घाट माथ्यापासून ते नाशिक शहरापर्यंत जागोजागी मोठ्या प्रमाणात वर्षभरापासून कामकाज सुरू आहे. मात्र अजूनही त्यांना पूर्ण करण्यास मुहूर्तावर-मुहूर्त शोधण्याची वेळ आली आहे. २०१८मध्ये कसारा घाटात दोन्ही बाजूने तीव्र चढ-उतार असून, नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भूस्सखलन झाले होते.

जागोजागी अर्धवट कामे

अर्धा महामार्ग त्यात नामशेष झाला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून आजही या मार्गावर एकेरी वाहतूक, नित्याची वाहन कोंडी होत आहे. जुन्या कसारा घाटातील जीर्ण संरक्षक कठडे निर्लेखन केलेले आहे. मात्र कामकाज अद्यापही झालेले नाही. महामार्ग पोलिसांना नित्याची धावपळ सुरू असते. रात्री-अपरात्री अपघात झाल्यास मदतीअभावी येथील प्रवास सुरक्षित असेल का, असा प्रश्‍न प्रवासी-वाहनचालकांना पडतो. महामार्गासाठी जागोजागी उड्डाणपूल, अंडर बायपास, रुंदीकरण असो वा साइडपट्ट्यांची झालेली वाताहत, निव्वळ घोषणाबाजी होऊन वर्ष उलटले. यात सुधारणा अथवा काम युद्धपातळीवर गतिमान झालेले नाही.

चौफुल्या की मृत्यूचे साफळे

सिन्नर-फाटा, मुंढेगाव, बोरटेंभा फाटा, पाडळी, आठवा मैल दुभाजक रात्री चालकाला दिसत नाही. रिफ्लेक्टर अथवा दिशादर्शक बोर्ड नाही. रायगडनगर व पाडळी शिवारात तीव्र स्वरूपाचा चढा-उतार असताना गतिरोधक नाही. वाहनावरील ताबा सुटून अपघात होतो.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची