सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय? : छगन भुजबळ

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इतिहासात डोकावून पाहिले तर प्रत्येकाच्या बाबतीत प्लस-मायनस दिसत असते. खरे तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याबाबतीत वक्तव्य टाळता आले असते तर बरे झाले असते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त करत सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या त्यांच्या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय, असा प्रश्न उपस्थित केला.

नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शुक्रवारी (दि.18) आयोजित आढावा बैठकीप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. आपल्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. मात्र, त्यांना सांगणारा मी कोण? राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून सध्या भाजप, मनसे आणि शिंदे गट यांच्याकडून आंदोलने केली जात असून, त्यावर महाविकास आघाडीतील नेते भुजबळांनी भाष्य करत नाराजी प्रकट केली आहे. राहुल गांधी यांची यात्रा अतिशय व्यवस्थित चांगली होती. परंतु, माध्यमे यात्रा दाखवत नव्हते. वादामुळे यात्रा चर्चेत आली असून, त्याचा फायदा राहुल गांधींच्या दृष्टीने नक्कीच झाल्याचा टोलाही भुजबळांनी लगावला. इतिहासात आता जाण्यात काही अर्थ नाही. महागाई, बेकारी आहे. दडपशाही करून वेगवेगळ्या संस्था सत्ताधारी ताब्यात घेत एकतर्फी कारभार करत असून, त्यावरही गांधी बोलत असल्याने त्यांना सगळीकडे चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावाही भुजबळांनी केला. आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्याने ओबीसी आरक्षण कमी झाल्याचे ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मर्यादा शिथिल करा
मागासवर्गीयांच्या आरक्षणाला असलेली घटनेची 50 टक्क्यांची मर्यादा आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिथिल करता येते, तर मग मराठा आरक्षणासाठी ही मर्यादा शिथिल का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. आर्थिक आरक्षणामुळे आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. मग आता मराठा समाजाला 10 टक्के आणि आदिवासी बहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी घटकाला 27 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा :

The post सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरणार्‍या मातृसंस्थेचे स्वातंत्र्यासाठी योगदान काय? : छगन भुजबळ appeared first on पुढारी.