सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर

भारती पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थं देण्यात येणारा कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार सन २०२२-२३ चा कार्यक्षम खासदार पुरस्कार आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांना जाहीर झाला आहे. ५० हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष आहे.

यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदार यांना दिला जात होता परंतू मागील दोन वर्षापासून पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून एक वर्ष आड हा पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिला जातो.

माधवराव लिमये ज्येष्ठ समाजवादी नेते होते. पत्रकार, लेखक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निवड समितीच्या वतीने दरवर्षी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा यापैकी एका सदस्याची निवड कार्यक्षम आमदार/खासदार पुरस्कारासाठी केली जाते. खासदार हेमंत गोडसे, पत्रकार प्रशांत रामदास, मंगेश वैशंपायन, संजय पाठक, डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. शोभा नेर्लीकर, डॉ. आर्चिस नेर्लीकर, सावाना अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, वैद्य विक्रांत जाधव, गिरीश नातू, डॉ. धर्माजी बोडके यांनी पुरस्कार निवड समितीचे काम बघितले. येत्या नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुरस्कार वितरणाचा समारंभ होणार असल्याचे सावानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post सावानाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ. भारती पवार यांना जाहीर appeared first on पुढारी.