सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी झाले ‘इतके’ मतदान

सिनेट निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी (दि.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला आहे. निर्धारित मुदतीत अवघे ३७.१४ इतके टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का दुपटीने वाढला आहे. या निवडणुकीसाठी १६ हजार ३६२ मतदार पात्र ठरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ६ हजार ८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मंगळवारी (दि.२२) विद्यापीठ प्रांगणात मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमअंतर्गत विद्यापीठाच्‍या नोंदणीकृत पदवीधरांकडून विद्यापीठाच्‍या अधिसभेवर सदस्‍य निवडीसाठी निवडणूक सूचना जारी केली हो्ती. पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्‍या पुणेसह नाशिक व नगर जिल्‍ह्यातील मतदारांना निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला होता. दहा जागांपैकी पाच जागा खुल्‍या प्रवर्गासाठी होत्या. तर उर्वरित पाच जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्‍त जाती) किंवा भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग व महिला उमेदवारांसाठी जागा राखीव होत्या.

सिनेटच्या दहा जागांसाठी विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेले विद्यापीठ विकास मंच, महाविकास आघाडी आणि छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. विकास मंचाने दहा, महाविकास आघाडीने आठ, तर शाहू पॅनलने सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. शहरातील एचपीटी व आरवायके महाविद्यालय, व्‍ही. एन. नाईक, भोसला महाविद्यालय, के के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, सिडको महाविद्यालय, नाशिकरोड बिटको महाविद्यालय या केंद्रांसह तालुक्यातील केंद्रांवर २४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद केले.

मतदान केंद्र बदलामुळे गाेंधळ

सिनेट निवडणुकीसाठी पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ७१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही मतदारांना स्थानिक केंद्राऐवजी जिल्ह्याबाहेर इतरत्र केंद्र देण्यात आल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. त्यामुळे संबंधित मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

हेही वाचा :

The post सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी झाले 'इतके' मतदान appeared first on पुढारी.