सावित्रीबाई फुले स्मारकाचा मार्ग मोकळा

सावित्रीबाई फुले स्मारकाचा मार्ग मोकळा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; पुण्यातील भिडेवाड्यासंदर्भातील स्थानिक पोटभाडेकरूंनी पुणे महापालिका व राज्य सरकारविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने आता लवकरच ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ या नावाने भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या स्मारकाचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

या निकालाबद्दल उच्च न्यायालयासह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी आदींचे आभारही मानले. पुण्यातील भिडेवाड्यासंदर्भातील तेथील स्थानिक पोटभाडेकरूंनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आज येथील कार्यालयात भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भिडेवाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी समता परिषदेचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. २०१० मध्ये या ठिकाणी स्मारक करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने निर्णय घेतला. त्यानंतर तेथील स्थानिक पोटभाडेकरूंनी पुणे महापालिका, महाराष्ट्र शासन यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने विधिज्ञांची नेमणूक करून आपली बाजू सातत्याने मांडली होती. न्यायमूर्ती जी. एस. पटेल व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने आज याबाबत निर्णय दिला. यासाठी राज्यशासनाच्या वतीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी, तर पुणे महापालिकेच्या वतीने माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या लढ्याला यश आले. आता पुणे येथील भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्षा कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर एंडाईत, महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, किशोरी खैरनार, अमोल नाईक, प्रा. ज्ञानेश्वर महाजन, रवींद्र शिंदे, संदीप गांगुर्डे, अमर वझरे, नाना पवार, भारत जाधव, प्रकाश माळी, अमोल कमोद, उपेश कानडे, प्रा. मोहन माळी, निशा झनके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा आढाव, कै. नरके यांची मदत

भिडेवाड्यातील स्मारकासाठी समता परिषदेचे कार्यकर्ते बाबा आढाव यांनी अनेकदा आंदोलने केली होती. जागेवर दावा करताना याठिकाणी शाळा असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याने महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा पोटभाडेकरूंनी आपल्या याचिकेते केला होता. याठिकाणी शाळा असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्रा. हरी नरके यांनी मेहनत घेऊन पुरावे गोळा केले होते. तसेच कोल्हापूर विद्यापीठातील प्रा. मंजूश्री पवार यांनीसुद्धा मदत केली होती.

हेही वाचा :

The post सावित्रीबाई फुले स्मारकाचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.