सासर, माहेरच्या राजकीय वारसाने ‘जगताप’ घराण्याला दुसऱ्यांदा सरपंचपद! 

अंदरसूल (जि.नाशिक) : येवला तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या अंदरसूल ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सविता शरद जगताप यांना सुरवातीपासूनच माहेर आणि सासरची राजकीय पार्श्‍वभूमी लाभल्याने जगताप घरण्यातून यशस्वीपणे केलेली उमेदवारी सार्थ ठरवली. सरपंचपदावर पहिल्यांदाच विराजमान होताना सर्वप्रथम सर्व सहकारी सदस्यांच्या मदतीने गावविकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन जगताप यांनी सत्कारप्रसंगी दिले. 

संपूर्ण तालुक्यात दांडगा जनसंपर्क
सरपंच जगताप यांना माहेर आणि सासरी राजकीय वारसा आधीच होता. जगताप यांचे आजोबा दामू शेळके जिल्हा परिषद सदस्य असताना सुरवातीपासूनच शेळके कुटुंबीयांचा राजकीय क्षेत्रात दबदबा राहिला आहे. आई पुष्पाताई शेळके यांनी सभापतिपद भूषविलेले असून, आताच ठाणगाव येथील ग्रामपंचायतीतून त्या बिनविरोध निवडून आल्या. तर वडील रामराव शेळके यांनी बालवयातच जगताप यांना राजकीय धडे शिकविले. तर सासरी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत मोलमजुरी करीत आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी शेती व्यवसायाची जोड देऊन आपल्या संपुर्ण कुटुंबाचा आधारवड बनलेले आजोबा दिवंगत रघुनाथ जगताप (पहिलवान) यांनी गावातील जनार्दन पागिरे, अशोक पागिरे, सोपान पवार, शिवाजी धनगे यांच्यासारखे नावाजलेले पहिलवान तयार केल्याने गावात रघुनाथ पहिलवान म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून संपूर्ण तालुक्यात दांडगा जनसंपर्क वाढवला.

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

सासऱ्यांचा विविध क्षेत्रांत राजकीय दबदबा

सासरे सूर्यभान जगताप यांचा विविध क्षेत्रांत राजकीय दबदबा असल्याने सासर आणि माहेर या दोन्हीही बाजूने श्रीमती जगताप यांना एक प्रकारचे बाळकडूच मिळाले. विशेष म्हणजे राजकीय, सामाजिक क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जगताप घराण्यातून नवनिर्वाचित सरपंच सविता जगताप यांच्या जाऊबाई नम्रता जगताप यांनी येवला पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले आहे. तर दुसऱ्या जाऊबाई मनीषा दीपक जगताप यांनीही अंदरसूल ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून सरपंचपदाला गवसणी घातली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद भूषविले आहे. दुसऱ्यांदा जगताप घराण्यातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या रूपाने सरपंच जगताप यांची राजकीय क्षेत्रात पहिली एन्ट्री झाली, ती त्यांचे मोठे दीर दीपक जगताप यांनी उमेदवारी करण्याचा आग्रह धरल्यानेच.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

अंदरसूलच्या सरपंचपदाला गवसणी

सासरे रावसाहेब जगताप व कैलास जगताप, दीर जीवन, प्रमोद व पती शरद जगताप यांची खंबीर साथ व मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच येवला तालुक्यातील सर्वांत मोठ्या अन्‌ वीस हजार लोकसंख्या असलेल्या अंदरसूलच्या सरपंचपदाला गवसणी घातली. हा अविस्मरणीय क्षण मला माझ्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच प्रेरणादायी ठरणार असल्याचे सरपंच जगताप यांनी सांगितले.