साहेब, दया दाखवा… दिवाळी बोनस द्या!

ओझर : मनोज कावळे
राज्य शासन राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देते. परंतु, पोलिसदेखील राज्य सरकारचेच कर्मचारी असूनही पोलिसांना मात्र दिवाळीत बोनस दिला जात नाही. चोवीस तास कर्तव्य बजावूनही बोनससाठी विचार केला जात नाही. कर्तव्याच्या मोबदल्यात दया करून देशातील इतर राज्यांप्रमाणेच एक महिन्याचा पगार हा दिवाळी बोनस पोलिसांना द्यावा, अशी मागणी धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. चव्हाण यांचे हे पत्र सोशल मीडियात फिरत आहे.

उन, वारा, पाऊस यापैकी कशाचीही तमा न बाळगता, सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेणार्‍या पोलिसांबाबत राज्य सरकार कायमच दुजाभाव करत आले आहे. इतर शासकीय कर्मचार्‍यांना शासकीय सुट्या असताना, दसरा-दिवाळीसह अन्य सणांच्या वेळी पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या जातात. पोलिसांना महत्त्वाचे सण आपल्या परिवाराविनाच साजरे करावे लागतात. सात दिवस चोवीस तास कायमच खुले असणारे एकमेव शासकीय कार्यालय म्हणजे पोलिस ठाणे. परंतु, याच पोलिस दलाची महाराष्ट्रात कोणतीही संघटना नसल्याने सर्वसामान्यांवरील अन्याय दूर करण्याचे कर्तव्य पार पाडणार्‍या पोलिसांवर होणार्‍या अन्यायाविषयी त्यांना मूग गिळून गप्प बसावे लागते. याच उद्विग्न अवस्थेतून एका पोलिस निरीक्षकाने पोलिस दलातील बांधवांच्या भावना एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, अर्थमंत्री, पोलिस महासंचालक तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक यांना कळविल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार पोलिस दल वगळून इतर राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी फक्त पाच दिवसांचा आठवडा आहे. वर्षभरात 52 शनिवार येतात. तसेच प्रत्येक वर्षात पोलिस वगळून इतर सर्वांसाठी 24 शासकीय सुट्या असतात. परंतु, पोलिस मात्र 52+24=76 दिवस 12 ते 15 तास आपले कर्तव्य बजावत असतात. कायद्याने व माणुसकीने बघितले, तर पोलिसांना 76 दिवसांचा पगार अदा केला पाहिजे, परंतु पोलिसांना व त्यांच्या परिवाराला संपूर्ण आयुष्य तडजोड करायची सवय असल्याने तडजोड करून फक्त एक महिन्याचा पगार पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून द्यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून पोलिस दल शासनाकडे करत आहे. सध्या हे पत्र पोलिस दलात चर्चेचा विषय झाले असून, सोशल मीडियातही ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तत्कालीन युती सरकारकडून बोनस : राज्यात 1995 साली शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पोलिसांना 1999 पर्यंत दरवर्षी नियमित दिवाळी बोनस दिला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रात शिंदे गट व भाजपचे सरकार आल्याने पोलिस दलाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा:

The post साहेब, दया दाखवा... दिवाळी बोनस द्या! appeared first on पुढारी.