नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सन २०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंंहस्थ कुंभमेळ्यात मागील कुंभापेक्षा अधिक गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गर्दीच्या नियोजनासंदर्भात आराखडा तयार करून तो सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. संबंधित आराखड्यात सूचना, तांत्रिक बाबी व त्यांचे स्पष्टीकरण करून मंगळवारी (दि.२५) आराखडा द्यावा, असेही सांगण्यात आले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शर्मा यांनी शुक्रवारी (दि.२१) पर्यटन विभाग, राज्य परिवहन महामंडळ, राज्य वीजपुरवठा विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी शर्मा यांनी मार्गदर्शन केले.
राज्य वीज वितरण कंपनीने सिंहस्थाकरिता ३०४ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, निधी मागणीचे पत्र सादर केले आहे. या निधीमधून विविध ठिकाणी सबस्टेशन, डीपींची दुरुस्ती, नवीन वाहिन्या उभारणे तसेच विद्युत तारांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. गेल्या सिंहस्थात ३० कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाने भाविकांच्या स्नानानंतर कुंडात पाणी स्वच्छतेबाबतच्या उपाययोजना, पाण्याचे निर्जंतुकीकरण, प्रदूषण वाढची संभावना यासह अन्य बाबींबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच विविध विभागांनी आपल्या विकास योजनेत आवश्यक व अडचणीच्या ठरणाऱ्या गोष्टींबाबत जिल्हा प्रशासन मदत करेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नायब तहसीलदार मोराणकर उपस्थित होते.
बसेसबद्दल माहिती द्या
गेल्या सिंहस्थात राज्य परिवहन महामंडळाच्या विकासकामांसाठी १० कोटी रुपये निधी देण्यात आला होता. यंदा एसटी महामंडळाच्या जोडीला सिटीलिंक सेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आवश्यक बाबींची पूर्तता नवीन गाड्या हव्या आहेत का?, भाडेतत्त्वावर बसेस घेणे सोयीचे आहे यासह अन्य बाबींवर सविस्तर अभ्यास करून माहिती संकलित करावी. तसेच पर्यायी उपाययोजनांवरही विचार करून त्यानुसार आराखड्याचे सादरीकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा: