Site icon

सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथे 200 खाटांचे रुग्णालय साकारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रुग्णालय इमारतीच्या कच्चा आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्याची सोमवारी (दि. 9) पाहणी करत शहर अभियंता नितीन वंजारी यांनी माहिती घेतली.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पंचवटीत रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री दादा भुसे यांनी पंचवटी आणि सिडको येथे दोन रुग्णालये उभारण्याबाबत मनपा प्रशासनाला आदेश दिले होते. त्याची दखल घेत मनपा वैद्यकीय विभागाने पंचवटी व सिडको भागात प्रत्येकी 200 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार केला असून, एका रुग्णालयासाठी 55 कोटी याप्रमाणे 110 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नगररचना विभागाकडून जागा निश्चिती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालय असलेल्या जुन्या जागेवर रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव आमदार ड. राहुल ढिकले यांनी दिला आहे. त्यानुसार या जागेवर कशा प्रकारचे रुग्णालय असेल याबाबतचा कच्चा आराखडा सायनेक्टिक्स आर्किटेक्टच्या प्रतिनिधींनी शहर अभियंता नितीन वंजारी यांना प्राथमिक माहितीसाठी सादर करत माहिती दिली. रुग्णालयाकरता दोन्ही बाजूने मोठ मोठे एट्रन्स असणार असून, तळमजल्यात संपूर्ण दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग असेल. तसेच सध्या या जागेवर काही मनपाचे जुने गाळेधारक असून, त्यांना ग्राउंडफ्लोअरवर गाळे देण्यात येतील. रुग्णालय तीनमजली असणार आहे. त्यात सर्व प्रकारच्या आजारांचे निदान आणि उपचार करण्याबाबतचे वॉर्डस् असतील. मनपा वैद्यकीय विभागाकडून आयुक्तांच्या मंजुरीने प्रस्ताव पुढे केंद्र व राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून, त्यानंतरच रुग्णालयांसाठी निधीचा मार्ग मोकळा होईल. नाशिक शहरात महापालिकेची चार मोठी रुग्णालये असून, त्यात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयासह जुने नाशिक येथे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, मोरवाडी रुग्णालय आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचा समावेश आहे. या चार रुग्णालयांव्यतिरिक्त मनपाचे मोठे रुग्णालय नाही. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या विचारात घेता तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी व सिडको विभागात प्रस्तावित रुग्णालये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

रुग्णालयाच्या एट्रन्सबाबतची अडचण जाणवत होती. परंतु, दोन्ही बाजूने जाण्या-येण्यासाठीचा प्रशस्त मार्ग आहे. ते कच्च्या आराखड्याद्वा रे दाखविण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विचार करता रामकुंड या महत्त्वाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन मिनिटांवर हे रुग्णालय असेल. – अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार- पूर्व विधानसभा.

हेही वाचा:

The post सिंहस्थ कुंभमेळा-2027 : पंचवटीतील रुग्णालयाचा आराखडा सादर appeared first on पुढारी.

Exit mobile version