सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित

जलशुध्दीकरण केंद्र संग्रहित www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी फाटा परिसरात 135 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेतून केंद्राचा प्रस्ताव साकारला जाईल किंवा सिंहस्थ निधीतून हे केंद्र उभारले जाणार आहे.

नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे 20 लाख इतकी असून, शहराला गंगापूर, मुकणे, दारणा या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. वाडीवर्‍हेजवळ मुकणे धरणातून 18 किलोमीटर लांबीची व जवळपास 1800 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली असून, विल्होळी येथे महापालिकेच्या जागेत 137 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करून पूर्व विभागात पुरवठा केला जातो. विशेष करून पाथर्डी फाटा परिसर, इंदिरानगर तसेच वडाळा गाव इथपर्यंत पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. परंतु या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा अधिक करावा लागत असून, वाढत्या पाण्याची गरज लक्षात घेऊन विल्होळी नाका येथे 135 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. सिंहस्थानिमित्त या जलशुद्धीकरण केंद्राचे काम केले जाणार आहे.

इतर जलशुद्धीकरण केंद्रांची कामे
केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. सिंहस्थासाठी प्राप्त निधीतून या प्रकल्पाचे काम केले जाणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रांबरोबरच जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलणे तसेच गंगापूर धरणापासून शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 12 किलोमीटर लांबीची सिमेंट पाइपलाइन बदलून त्याऐवजी लोखंडी पाइपलाइन टाकली जाणार आहे.

हेही वाचा:

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : पाथर्डी फाटा परिसरात जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित appeared first on पुढारी.