सिग्नल यंत्रणेमुळे मालेगावकरांना लागणार शिस्त; नागरिकांकडून समाधान व्यक्त

मालेगाव (नाशिक) : शहरातील मुख्य रस्त्यावर नित्यनेमाने होणारा वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आता कमी होणार आहे. कारण शहरातील मुख्य भागात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने मालेगावकरांना वाहतूक नियमांबाबत आता शिस्त लागणार आहे. 

शहरात दोन दिवसांपासून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर मोसम पूल चौकात वाहतुकीची होणारी कोंडी कमी होत आहे. यापूर्वी मुख्य रस्त्यांवर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीने वादावादीचे प्रसंग घडत होते. या धर्तीवर नागरिकांची वारंवार सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होती. नगरसेवक गिरीश बोरसे यांच्या निधीतून शहरातील मध्यवर्ती भागात सिग्नल बसविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

बदलत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला खीळ बसत होती. कारण शहरातील मोसल पूल भागात पाच रस्ते एकत्र येतात. शहराच्या सर्व मुख्य भागांतील दळणवळण मोसम पूल चौकातून होत असते. विशेषतः शहराच्या अनेक शाळा याच परिसरात असल्याने विद्यार्थ्यांनाही वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत. मात्र आता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्याने तसेच यंत्रणेसाठी चौकातील अडथळे काढल्याने चौकाने मोकळा श्वास घेतला. रस्ता चहुबाजूंनी रुंद झाला आणि अवैध वाहतूक वाहने, रिक्षा यांनीही थांबे बदलले आहेत. त्यामुळे आता वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

पोलिसांच्या जबाबदारीत वाढत 

दरम्यान, सिग्नल यंत्रणेमुळे मोसम पुलावर वाहतूक पोलिसांची सध्या जबाबदारी वाढली आहे. विशेषतः कोंडी होणाऱ्या ठिकाणांमध्ये शिवाजी पुतळा, एकात्मता चौक, सटाणा नाका, नवीन बसस्थानक, कॉलेज स्टॉफ, रावळगाव नाका या चौकांमध्ये शहर वाहतूक पोलिसांनी व महापालिकेने लक्ष केंद्रित करण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

शहर बदलत असताना अद्यापही अनेक नागरी सोयी-सुविधांचा अभाव आहे. सिग्नलच्या सुविधेने सततच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून शिस्त लागणार आहे. तसेच किरकोळ अपघात, वादविवाद टाळले जातील. 
- संदीप पवार तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

शहराच्या मध्यवर्ती चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आल्याने या भागात रस्ते ओलांडताना ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांना सोयीचे होईल. अशीच सुविधा शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी व्हावी. 
- साधना देसले, नागरिक