सिटीलिंक आजपासून पूर्ण क्षमतेने धावणार; ११५ बसफेऱ्या वाढणार

सिटीलिंक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – उन्हाळी सुट्ट्यांमुळे विद्यार्थी व पालकांच्या रुपाने घटलेला प्रवासीवर्ग शाळेची घंटा वाजल्याने पुन्हा प्राप्त होणार असल्याने सिटीलिंकची बससेवा मंगळवार (दि. १८) पासून पूर्ण क्षमेतेने सुरू होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे बंद करण्यात आलेल्या ३५ बसेसची सेवा पूर्ववत सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय विविध मार्गांवरील विद्यार्थ्यांच्या सेवेकरिता ११५ बसफेऱ्या वाढविण्यात येत आहेत.

  • २४५ पैकी ३५ बसेसची सेवा २५ एप्रिलपासून बंद करण्यात आली होती
  • शाळा सुरु झाल्याने मंगळवार (दि. १८) पासून सिटीलिंक बसेस सुरु होत आहेत.
  • विद्यार्थ्यांच्या सेवेकरिता ११५ बसफेऱ्या वाढविण्यात येत आहेत.

सिटीलिंकच्या माध्यमातून गेल्या ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवा चालविली जात आहे. यासाठी ‘ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट’ तत्त्वावर खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ६३ मार्गांवर २४५ बसेस सुरू करण्यात आल्या. चांगल्या दर्जाच्या प्रवासी सुविधांमुळे सिटीलिंकची ही बससेवा अल्पावधीतच नाशिककरांच्या पसंतीस उतरली. विशेषत: कामगारवर्ग आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही बससेवा उपयुक्त ठरत आहे. शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्यामुळे सिटीलिंकच्या प्रवाशी संख्येत घट झाली होती. त्यामुळे २४५ पैकी ३५ बसेसची सेवा २५ एप्रिलपासून बंद करण्यात आली होती. याशिवाय अन्यही काही बसेसच्या फेऱ्यांमध्ये कपात केली होती. आता नूतन शैक्षणिक वर्षाला १५ जुनपासून प्रारंभ झाल्याने सिटीलिंकने बंद केलेल्या ३५ बसेसची सेवा पुर्ववत हाेत आहे. याशिवाय विविध मार्गांवरील ११५ बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

पास केंद्रांमध्ये वाढ

विद्यार्थ्यांना प्रवासी पासेस काढण्यासाठी सिटीलिंकने पास केंद्राच्या संख्येत वाढ केली आहे. केटीएचएम महाविद्यालय, सातपूर येथील शिवाजीनगर मनपा शाळा तसेच नाशिक रोड बसस्थानकात प्रत्येकी एक, तर निमाणी बसस्थानक, सिटीलिंक मुख्य कार्यालयात प्रत्येकी दोन पासकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थीसंख्या वाढल्यास या पास केंद्रांच्या संख्येत वाढ केली जाऊ शकते.

हेही वाचा: