सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव : आई-वडीलांचे संस्कार-शाळेची शिस्त आयुष्यात महत्त्वाची

सिध्दार्थ जाधव www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांशी ‘बालभारती’ चित्रपटातील कलाकारांनी संवाद साधला. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन सखोल वाचन करावे व लेखन करून आपला शिक्षणाबाबतचा दर्जा उंच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले आवडते छंद प्रत्येकाने मनापासून जोपासले पाहिजे हे करत असताना शाळेची शिस्त व आई वडिलांचे संस्कार अंगीकृत करावे असे प्रतिपादन अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी केले. ग्रंथ तुमच्या दारी “प्रणेते विनायक रानडे” यांच्या संयोजनाने हा कार्यक्रम घडून आला.

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयातील विद्यार्थ्याशी संवाद साधताना अभिनेते सिद्धार्थ जाधव बोलत होते. याप्रसंगी त्यांनी आंतरशालेय स्पर्धेत विजयी ठरलेल्या पेठे हायस्कूलच्या विविध संघांचे,खेळाडूंचे कौतुक आवर्जून केले. यावेळी बालभारती चित्रपटातील कलाकार आर्यन मेंघजी, दिग्दर्शक नितीन नंदन व सर्व कलाकार उपस्थित होते. विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक यांच्याशी संवाद साधताना सिद्धार्थ जाधव म्हणाले की, बालभारती हा चित्रपट प्रत्येक कुटुंबात त्यांच्या मुलांच्या भोवती घडत असणाऱ्या गोष्टींवर भाष्य करणारा चित्रपट आहे. मराठी माध्यमाच्या एका शाळेत शिकणाऱ्या आणि संशोधकाची भूमिका असलेल्या एका हुशार मुलाच्या संशोधनात आणि सादरीकरणात वारंवार येणारा भाषेचा अडसर आणि पालकांनी करून घेतलेला ग्रह या गोष्टीवर बालभारती चित्रपट आधारित आहे. आपले वडील आणि मुलाचे जिव्हाळ्याचे प्रसंग ही चित्रपटात गंमतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी पालक कुठेच कमी पडत नाही तसे चित्रपटातील बापाने केलेली धडपड या चित्रपटात प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. सर्वांनी आपल्या आई-वडिलांसह बालभारती हा चित्रपट पाहावा असे देखील आवाहन केले. याप्रसंगी पेठे विद्यालयातील सकाळ सत्रातील बाल गोपाळ यांनी अभिनेते सिद्धार्थ जाधव आणि बालकलाकार आर्यन याच्याशी मनमुराद गप्पा केल्या. अभिनेते जाधव यांच्यातील उत्साह पाहून मुलांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. मुला मुलींमध्ये जाऊन सिद्धार्थ जाधव यांनी त्यांना आनंद देण्याचा व प्रोत्साहित करण्याचा केलेला प्रयत्न व साधलेला संवाद कौतुकास्पद व मनाला आनंद देणारा ठरला. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह राजेंद्र निकम यांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनेते सिद्धार्थ जाधव, दिग्दर्शक नितीन नंदन आणि बालकलाकार आर्यन व संयोजक विनायक रानडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील, उपमुख्याध्यापिका संगीता थोरात, थोरात,पर्यवेक्षक रवींद्र पगार,दिलीप अहिरे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते. शाळा शिक्षक प्रतिनिधी व संस्थेचे सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

हेही वाचा:

The post सिनेअभिनेते सिद्धार्थ जाधव : आई-वडीलांचे संस्कार-शाळेची शिस्त आयुष्यात महत्त्वाची appeared first on पुढारी.