सिन्नरच्या पूर्व भागातील ४०० हेक्टर कांद्याला फटका; अवकाळी, गारपिटीने १०० हेक्टर गहू आडवा 

सिन्नर (जि. नाशिक) : दोन ते तीन दिवसांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पोटात धस्स झाले आहे. पाथरे, सायाळे, दुसंगवाडी, मिरगाव, पिंपरवाडी, वावी, निऱ्हाळे, घोटेवाडी या भागात गारांनी झोडपून काढल्याने सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावरील कांदापिकाचे नुकसान झाले. काढणीला आलेल्या गव्हाचे शंभर हेक्टरवरील पीक वादळाने भुईसपाट होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. 

दोन वर्षांपासून पावसाने कृपादृष्टी केल्याने सिन्नरच्या दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या पूर्व भागात बारमाही पिके बहरल्याचे आशादायी चित्र आहे. यंदा कांद्याची विक्रमी लागवड झाली असून, गहू व रब्बी पिकांनी शेतकऱ्यांना चांगलीच उभारी मिळाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र आहे. वावीसह पूर्वेकडील भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावत काढणीस आलेला गहू, उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान केले. सोसाट्याचा वारा, गारांचा मारा यामुळे कांदापात तुटली असून, गहू शेतातच आडवा झाला आहे. पाथरे, वावी, पिंपरवाडी, मिरगाव, सायाळे, मालढोण, दुसंगवाडी, निऱ्हाळे, फत्तेपूर, गोंदे, दापूर, खंबाळे या भागात सुमारे ४०० हेक्टर कांदा, तर १०० हेक्टर गहू पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने रब्बीचा हंगाम आशादायी असतानाच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणीनुसार पूर्व भागात ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक फटका कांदा पिकास बसला आहे. दोन वर्षांपासून कांद्याच्या भावात चढ-उतार असला, तरी शेतकऱ्याच्या हातात बऱ्यापैकी पैसा राहत असल्याने यंदाच्या हंगामातही विक्रमी कांदालागवड झाली आहे. पावसाळ्यात कांदारोप सडून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळेल तेथून बियाणे उपलब्ध करून घेतले. हाताशी आलेले पीक गारपिटीने उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

फळबागांचे नुकसान 

पूर्व भागात शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात केली असून, बहुसंख्य ठिकाणी बहर आला आहे. वादळाने झाडांच्या फांद्या तुटल्या, फुले व फळे गळाली असून, गारांच्या टपाऱ्याने झाडांना व फळांना नुकसान पोचले आहे. दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीत उभ्या केलेल्या डाळिंबावर बुरशीजन्य रोग येण्याची भीती वाढली आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने पंचनामे करावेत, कृषीमार्फत शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी सल्ले मिळावेत, अशी मागणी सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

 अवकाळीमुळे सिन्नर तालुक्यात एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची शक्यता आहे. यात पूर्व भागात कांदा, गहू या प्रमुख पिकांसह डाळिंब, द्राक्षबागांचे अधिक नुकसान झाले आहे. शासनस्तरावर आदेश होताच पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून घेतले जातील. शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. 
-अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी