सिन्नरमधील केमिकल्स कंपनीवर छापा; दीड लाखांचे बनावट कीटकनाशक जप्त 

सिन्नर (जि.नाशिक) : तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील यशोधन ॲग्रो केमिकल्स कंपनीत कृषी अधिकारी तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे यांच्या पथकाने छापा टाकत कंपनीतून ‘निवान’ हे विनापरवाना कीटकनाशके जप्त केले. अधिकाऱ्यांनी या वेळी कंपनीतून अंदाजे एक लाख ६१ हजार २०० रुपयांचे बनावट कीटकनाशक जप्त केले.

यशोधन ॲग्रो केमिकल्स कंपनीवर छापा

या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीचे संचालक अजिंक्य घोलप (रा. पिंपळपट्टी मळा, पंचक, जेल रोड) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत कीटकनाशक कायद्यानुसार फिर्याद दाखल केली. मुसळगाव येथील यशोधन ॲग्रो केमिकल्स कंपनीत विनापरवाना ‘निवान’ हे कीटकनाशक विक्रीसाठी तयार करण्यात आले होते, याची माहिती अभिजित घुमरे यांना समजताच त्यांनी पथकासह कंपनीत छापा टाकला.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

दीड लाखाचे बनावट कीटकनाशक जप्त 

या वेळी कंपनीतून पथकाने अंदाजे एक लाख ६१ हजार २०० रुपयांचे बनावट कीटकनाशक जप्त केले. यात ५०० मिली मापाच्या १०० बाटल्या व २५० मिली मापाच्या १२० बाटल्या तसेच एक लिटरच्या ५० बाटल्या असा मुद्देमाल आहे. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अभिजित घुमरे यांच्यासमवेत कृषी अधिकारी संजय शेवाळे, किरण वीरकर यांचा पथकात समावेश आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच