सिन्नरमध्ये ‘बेमोसमी’नंतर अद्यापही १२ गावे, २५२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

टँकर pudhari.news

सिन्नर : संदीप भोर

सिन्नर तालुक्यातील काही गावांना गेल्या सव्वा वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत, मार्च २०२३ पासून आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर तब्बल ३ कोटीच्या घरात खर्च झाल्याचा आकडा समोर आला आहे. थोडाफार पाऊस झाला असला, तरी अजूनही १२ गावे व २५२ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दर आठवड्याला टँकरने पाणीपुरवठ्यावर सुमारे २१ लाख रुपये खर्च होत असे. आता हा खर्च १६ लाखांपर्यंत कमी झाला असल्याचे पंचायत समितीने सांगितले.

तालुक्यात २०२२ साली अतिवृष्टी झाली. सरासरीच्या तब्बल दुप्पट पाऊस झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातही बहुतेक जलस्रोत पूर्णपणे भरलेले होते. मात्र, गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने तालुकावासीयांना टंचाईचा सामना करावा लागला. ८ मे २०२३ पासून तालुक्यातील तीन गावे आणि काही वाड्यांवर १० शासकीय टँकरच्या माध्यमातून सुरू झालेला पाणीपुरवठा टेकरच्या वर्षपूर्तीनंतरही तसाच राहिला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींमध्ये पाणी उतरले असून, चार गावे आणि १२ वाड्यांचे टैंकर तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. पाऊस झाला नाही, तर या गावांना पुन्हा टँकर सुरू करावे लागतील, शासकीय टँकरच्या इंधन खर्चापोटी वर्षभरात अंदाजे एक कोटी ७० लाख खर्च झाले आहेत, तर खासगी टेंकर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू झाले असून, त्यावरही तब्बल एक कोटी ३० लाखांचा खर्च झालेला आहे. हा आकडा तीन कोटींच्या घरात पोहोचला आहे.

३७ टँकरच्या होतात ११२ फेऱ्या सिन्नर तालुक्यात आतापर्यंत १६ गावे आणि २६४ वाडांना दररोज १३१ टँकरच्या फेयांनी पाणी द्यावे लागत होते. टैंकरने दिवसभराचा पाणीपुरवठ्याचा आकडा तब्बल १४ लाख ७० हजार लिटरवर पोहोचला होता. तथापि, जोरदार बेमोसमी पाऊस झाल्याने सार्वजनिक विहीरीमध्ये पाणीसाठा होत आहे. त्यामुळे पांगरी, भरतपूर, रामपूर पुतळेवाडी, सुरेगाव अशी चार गावे व १२ वाड्यांचे टँकर बंद करण्यात आले असून, पंचायत समितीने सहा टँकर थांबविले आहेत. सध्या ३७ टँकरद्वारे ११२ फेऱ्या मारण्यात येत आहेत.

९५ लाख मिळाले; २ कोटी ३७ लाख अनुदान प्रलंबित

राज्य शासनाकडून टँकरने पाणीपुरवठ्यासाठी मार्च २०२४ पर्यंत जवळपास ९५ लाख ५० हजार रुपये अनुदान पंचायत समितीला प्राप्त झाले असून, अद्याप दोन कोटी ३७ लाखांचे अनुदान प्रलंबित आहे. लोकसभेच्या निवडणुकीमुळे हे अनुदान रखडले होते. ते काही दिवसांत प्राप्त होईल, अशी आशा पंचायत समितीला आहे.

मार्च २०२३ पासून टँकरवर ३ कोटी खर्च

  • सध्या ३७ टँकरद्वारे मारल्या जातात ११२ फेऱ्या
  • ४ गावे, १२ वाड्यांचे टैंकर तात्पुरत्या स्वरूपात बंद

हेही वाचा: