सिन्नरला खुलेआम होतेय मृत्यूची विक्री;मुलांच्या जीवघेण्या प्रकारास पालकांचेच प्रोत्साहन

सिन्नर (जि. नाशिक) : मकरसंक्रांतीला येवल्यापाठोपाठ सिन्नरचे आसमंतही विविधरंगी पतंगांनी व्यापलेले असते. पतंगांच्या काटाकाटीच्या खेळात आबालवृद्ध रंगून जातात. मात्र, नायलॉन मांजाच्या वापरामुळे हा खेळ जिवावर बेताणारा ठरला आहे. बंदी असूनही सिन्नरच्या गल्लीबोळात व ग्रामीण भागात नायलॉन मांजा बिनदिक्कत विकला जात आहे.

‘गटू’ या नावाने पाचशे रुपयांच्या घरात मिळणारा नायलॉन मांजा वापरास पालकांचेच मुलांना प्रोत्साहन असल्याचे चित्र सध्या तालुक्यात बघायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात नायलॉन आणि सजीवांना अपायकारक ठरणारा मांजा उत्पादित करणे, त्याची वाहतूक, विक्री अथवा वापर करण्यास दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र, या बंदीचे परिपत्रकच सिन्नरमधील प्रशासकीय यंत्रणांकडे पोचले नसावे, अशी शंका येते.

दहापैकी आठ जणांकडे नायलॉन मांजा

स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नायलॉन मांजाविक्री व वापर यासंदर्भात प्रतिबंध करणे आवश्यक असताना याबाबत कोणतीच हालचाल संक्रांत आठ दिवसांवर आली तरी दिसत नाही. पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, तर इतर क्षेत्रात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पोलिस यंत्रणेच्या मदतीने कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. आजघडीला सिन्नरला कोणत्याही मैदानावर अथवा घरांच्या गच्चीवर पतंग उडवणाऱ्या दहापैकी आठ जणांकडे नायलॉन मांजा असतो. यात मोठी माणसे आणि लहान मुलेदेखील सहभागी असतात. अशा पतंगबाजांकडे प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. अगदी तहसील कार्यालय, सिन्नर न्यायालय परिसर, आडवा फाटा मैदान किंवा कोणत्याही मैदानाकडे चक्कर मारली तरी निम्म्याहून अधिक मुलांकडे नायलॉन मांजा आढळेल. ग्रामीण भागातदेखील याहून वेगळी परिस्थिती नाही.‘गटू’ या टोपण नावाने आजघडीला नायलॉन मांजाची सर्रास विक्री करण्यात येत असून, सिन्नरच्या सर्वच भागांत मुबलक प्रमाणात दुकानदारांकडे साठा उपलब्ध असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

महामार्गावरील वाहतुकीकडे कानाडोळा...
 
नायलॉन मांजामुळे जीवघेणे अपघात होण्याच्या असंख्य घटना यापूर्वी घडल्या आहेत. दर वर्षी मकरसंक्रांत झाली की झाडांच्या फांद्यांमध्ये अडलेला मांजा कित्येक पक्ष्यांचा जीव घेतो. जमिनीवर पडलेला मांजा पायात अडकून अनेक जण जखमी होतात. पण, काटकाटीच्या खेळात आनंद लुटणाऱ्यांना याचे सोयरसुतक नसते. कटलेला पतंग पकडायला महामार्गावरील रहदारीचा विचार न करता मुले धावत असतात. हे चित्र सिन्नर शहरासोबतच नाशिक, निफाड, पुणे, शिर्डीकडे जाणाऱ्या महामार्गावर ग्रामीण भागातही दिसू लागले आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

महसूल विभागासह सिन्नर नगर परिषद व पंचायत समितीची यंत्रणा सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्त आहे. तरीदेखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तालुक्यात योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल. नायलॉन मांजा बहुतेकदा लहान मुलांच्या हातात असतो. अशावेळी त्यांच्या पालकांना कारवाईला सामोरे जावे लागेल. सिन्नर शहर तसेच ग्रामीण भागात कारवाई करण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत. पतंग विक्रेते, पतंग उडवणाऱ्या व्यक्तींची अचानकपणे तपासणी करण्यात येणार असून, आपण स्वतः या कारवाईत सहभागी होणार आहोत. - राहुल कोताडे, तहसीलदार, सिन्नर 

प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन 

सिन्नरमधील पतंग व मांजा विकणाऱ्या व्यापारी बांधवांनी नायलॉन मांजा विकू नये. नायलॉन मांजामुळे इजा होते एवढेच नव्हे, तर जीवही जाऊ शकतो. त्यास कारणीभूत होण्याचे पाप आपल्या माथ्यावर येऊ नये. व्यापारी वा अन्य कोणी समाजकंटक नायलॉन मांजा आणून त्याची विक्री करत असेल, तर त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन मनोज भगत, राजेंद्र देशपांडे, मनोज भंडारी, नामदेव लोणारे, कांचेश पवार, संतोष खर्डे, अतुल कासट यांच्यासह सिन्नर व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.