सिन्नर-शिर्डी महामार्गावर खड्डेच खड्डे! वाहन प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

सिन्नर (नाशिक) :  सिन्नर - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सद्यस्थितीत असलेला महामार्ग पुरता खड्डेमय झाला आहे. चौपदरी करणाच्या कामात या खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे (न्हाई) दुर्लक्ष झाले असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

अनलॉक होताच शिर्डी महामार्गावर गर्दी

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये सुनसान असलेला सिन्नर - शिर्डी महामार्ग आता अनलॉक होताच वाहनांच्या गर्दीने गजबजला आहे. तर चौपदरीकरणाच्या कामामुळे, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी लहान-मोठ्या अपघातांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात सरकारने कुलूपबंद असणारी धार्मिक स्थळे पूर्ववत उघडण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी येथील साईबाबा मंदिर भाविकांनी गजबजून जात आहे. मुंबई, नाशिक, गुजरात मधून शिर्डीच्या दिशेने वाहनांची वर्दळ वाढली असून काम सुरू असलेल्या महामार्गावरून प्रवास करणे जोखमीचे बनले आहे.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

चौपदीकरण कामामुळे वाढले अपघात

चौपदरीकरणासाठी केलेल्या भरावामुळे जुना रस्ता ठिकठिकाणी अरूंद झाला आहे. पाथरे, वावी, पांगरी, देवपूर फाटा, भोकणी फाटा, दातली, खोपडी, वडांगळी फाटा या भागात रस्त्यावर खड्डे पडले असून ते चुकवताना अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या रस्त्याची दुरुस्ती करून त्यावर डांबराचा थर टाकला जातो यंदा मात्र ही दुरुस्ती न झाल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

समृद्धीच्या वाहनांची भर...

सिन्नर -शिर्डी महामार्गसोबच समृद्धी महामार्गाचे काम देखील सुरू आहे. या दोन्ही कामांवर असणारी अवजड वाहने रात्रंदिवस धावत असतात. समृद्धीच्या वाहनांमुळे अगोदरच पूर्व भागातील लहानमोठे रस्ते खराब झालेले असताना त्यात पुन्हा शिर्डी महामार्ग देखील समृद्धीसाठी वापरला जात आहे.या वाहनांना कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर नसल्याने अनेकदा अपघात घडले आहेत. महामार्ग विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी तसेच ठेकेदारांना वाहन चालवताना सुरक्षिततेच्या सूचना करणे आवश्यक आहे.