सिलिंडर महागल्याने गृहिणीचा कल पुन्हा चुलीकडे; उज्ज्वला योजनेला काडी

ब्राह्मणगाव (जि. नाशिक) : घरगुती गॅस सिलिंडरचे दर ८६० रुपयांवर पोचले आहेत. त्या मुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे. कोरोनामुळे झालेला लॉकडाउन आणि हाताला काम नसल्याने पैसे जमविताना दमछाक होत आहे. 

घरगुती गॅस सिलिंडरचे सततच्या दरवाढीमुळे गृहिणींचे दर महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला पंतप्रधान योजनेंतर्गत अनेकांना नव्याने गॅस कनेक्शनचे वाटप करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना गॅसची सोय झाली. वृक्षतोड कमी व्हावी, यासाठी सरकारने सवलतीच्या दरात सर्वसामान्य जनतेला नवीन गॅस कनेक्शनचे वाटप केले. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या सततच्या दरवाढीने गृहिणींनी आपला मोर्चा पुन्हा कोळसा, चूल, सरपणासारख्या इंधनाकडे वळविला आहे. दोन वर्षांपूर्वी शासनाच्या नियमाप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरसाठी अनुदान थेट गॅसधारकांच्या बँक खात्यात जमा होत होते. मार्चपासून गॅस सिलिंडर घेतल्यानंतर सबसिडी तर नाहीच, सातत्याने होणारी सिलिंडरची दरवाढ ही सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

सतत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीने गृहिणींचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागातील बंद केलेल्या मातीच्या चुली परत पेटू लागल्या असून, धुराच्या विळख्यात स्वयंपाक करण्याची वेळ गृहिणीवर आली आहे. 
- सुरेखा अहिरे, ‘तनिष्का’, ब्राह्मणगाव 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड