सिलेंडरच्या स्फोटात शेतकरी कुटुंंबाच्या घर-संसाराची राखरांगोळी; संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे जळाली

खेडभैरव (जि. नाशिक) : पिंपळगाव मोर येथील गावालगत असलेल्या शेतकऱ्याच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला अन् शेतकरी कुटुंबाच्या घर- संसाराची राखरांगोळी झाली... झालेला स्पोठ इतका भीषण होता की घराची कौले देखील उडून पडली.

अशी घडली घटना

नामदेव बेंडकोळी यांचे कौलारू आणि सिमेंट पत्र्यांचे घर असून, तेथे ते कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरात पत्नी सीताबाई बेंडकोळी यांच्या नावे उज्ज्वला योजनेचे एच. पी. गॅस कंपनीचे सिलिंडर आहे. गुरुवारी (ता.१७) सकाळी साडेदहाच्या सुमारास घरात अगोदर जोडलेले सिलिंडर संपले. तेव्हा दुसरे सिलिंडर जोडताना स्फोट झाला. स्फोट होताच त्यांच्या घराने पेट घेतला. घोटी येथील हिंदुस्थान बिझ ॲन्ड गॅस सर्व्हिसचे जयप्रकाश नागरे, अधिकारी, वितरक तसेच मॅकेनिक, आग विझवण्याचे सिलिंडर घेऊन हजर झाले. त्यांनी घोटी टोल प्लाझा येथे कळवून येथील अग्निशमन दलाला पाचारण केले.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

घराची कौले उडाली

स्फोटाची तीव्रता इतकी होती, की घरावरील कौलारू खाली पडले. तसेच भिंतही कोसळली. ग्रामस्थांनी टँकरमधील पाणी घरावर टाकून आग विझवली. तलाठी संदीप कडनोर यांनी पंचनामा केला. आग विझविण्यासाठी मुरलीधर गातवे, जयराम काळे, गोटीराम काळे, रवी डगळे आदींनी मदत केली. 
 

सकाळी गॅस सिलिंडर बदलत असताना गॅसचा स्फोट झाला. स्फोटात घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तू, महत्त्वाच्या कागदत्रांदसह घर जळून खाक झाल्याने आमचे प्रचंड नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी शासनाने मदत करून हातभार लावावा. 
- नामदेव बेंडकोळी, नुकसानग्रस्त शेतकरी 

आम्ही गॅस वितरण कंपनीकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, कंपनीकडे विमा व नुकसानभरपाईसाठी कळविले. कंपनीकडून पुढील कार्यवाही लवकरच होणार आहे. 
- जयप्रकाश नागरे, हिंदुस्थान बिझ ॲन्ड गॅस सर्व्हिस  
 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा