सिव्हिल रुग्णालयाच्या आवारातच फार्मासिस्ट भरतीवेळी गोंधळ! गुणवत्ता यादी लावून हरकती मागविण्याचा काढला मार्ग  

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठीच्या डेडीकेटेड कोरोना रुग्णालय, डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर, कोरोना केअर सेंटरसाठीच्या औषधनिर्माणशास्त्र तज्ज्ञांच्या ४० जागा भरतीवेळी सोमवारी (ता. ५) जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्रात तोबा गर्दी झाली होती. त्यातच राखीव जागा भरल्याची माहिती मिळाल्याने व एका जागेसाठी तेराहून अधिक उमेदवार उपस्थित असल्याने गोंधळ उडाला. पालकमंत्री छगन भुजबळ यांची आढावा बैठक संपल्यानंतर गोंधळाची माहिती मिळताच, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर घटनास्थळी दाखल झाले. 

सिव्हिलच्या आवारात गोंधळ 
कोरोना विषाणू संसर्ग वाढत असताना एकीकडे गर्दी टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दुसरीकडे मात्र औषधनिर्माणशास्त्र तज्ज्ञांच्या भरतीसाठी साडेपाचशेहून अधिक उमेदवार आणि त्यांच्या पालकांची भरतीचे स्थळ गर्दीने फुलून गेले होते. ४० पदांसाठी दोनशेच्या आसपास उमेदवार येतील, असा अंदाज यंत्रणेचा होता. मात्र जिल्ह्यासह राज्यभरातून उमेदवार दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. भरतीसाठी सकाळी दहापासून उमेदवार आणि पालक जमले होते. त्याचा अंदाज यंत्रणेला कसा आला नाही? असा संतप्त सवाल उमेदवार उपस्थित करत होते. डॉ. आहेर यांना या परिस्थितीची माहिती मिळताच, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याशी चर्चा केली आणि गुणवत्तायादी लावण्याचा मार्ग काढला. संतप्त झालेले उमेदवार मात्र तत्काळ यादी लावा, यासाठी आग्रही होते.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

गुणवत्ता यादी लावून हरकती मागविण्याचा काढला मार्ग 

उमेदवारांची ही मागणी मान्य करत, काही वेळात गुणवत्तायादी लावण्याचे डॉ. आहेर यांनी मान्य केले. तसेच गुणवत्ता यादीवर हरकती मागवण्यात येतील. हरकतींचे निराकारण केल्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया राबवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भरतीच्या स्थळाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर गुणवत्तायादी प्रकाशित करून त्यावर हरकती मागविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आहेर यांनी उमेदवार आणि पालकांना दिली. 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

‘वॉक इन इंटरव्ह्यूव्ह’साठी बोलवण्याचा ‘फार्स' कशासाठी?

कंत्राटी व करार पद्धतीने मानधनावर औषधनिर्माणशास्त्र तज्ज्ञांच्या भरती होणाऱ्या जागांची संख्या अशी ः अनुसूचित जाती-३, अनुसूचित जमाती-९, व्हीजे ए-१, एन. टी. बी.-१, एन. टी. सी.-१, एन. टी. डी.-१, विशेष मागासप्रवर्ग-१, इतर मागासवर्गिय-४, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग-४, खुल्या-१५. भरती प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर उमेदवारांपर्यंत इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग आणि खुल्या जागा भरण्याऐवजी राखीव जागा भरल्याची माहिती धडकली. मग उमेदवारांच्या नाराजीचा बांध फुटला. इतर मागासवर्गीय, खुल्या जागा भरणार नसाल, तर उमेदवारांना ‘वॉक इन इंटरव्ह्यूव्ह’साठी बोलवण्याचा ‘फार्स' कशासाठी करण्यात आला, अशी विचारणा उमेदवारांचे पालक करत होते. 

चित्रीकरणाला मज्जाव 
सोशल मीडियामुळे चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामकाजाचे व्हिडिओ, छायाचित्रे पटकन व्हायरल होतात. पण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात इतकी मोठी गर्दी आणि गोंधळ सुरू असताना त्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे कशी घेतली नाहीत, अशी विचारणा उमेदवारांच्या समर्थकांकडून उपस्थित करण्यात येत होती. त्या वेळी पालकांकडून चित्रीकरण आणि छायाचित्रणाला मज्जाव करण्यात आल्याचे कारण पुढे केले जात होते. 
....