सिव्हिल हॉस्पिटलमधून अपहरण केलेली दीड वर्षांची चिमुकली अखेर सापडली! ‘असा’ लागला शोध

नाशिक : गेल्या शनिवारी भर दिवसा म्हणजेच दुपारी २ वाजता दीड वर्षांच्या मुलीला एका भामट्याने हॉस्पिटलमधून पळवून नेले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला.
प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या दीड वर्षांच्या मुलीला भामट्याने पळवून नेले. सिव्हिल हॉस्पिटलमधील पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला होता.

आईने चिमुकलीला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले
अपह्रत मुलीला घेऊन तिची आई व मावशी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली होती. बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. त्याचवेळी मुलगी झोपत असल्याने आईने तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले आणि आई पुन्हा कक्षात गेली. दुपारी दोनच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसली नाही. म्हणून आईने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपवून घेऊन जाताना आढळला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश

सीबीएस परिसरात सोडली चिमुकलीला

सिव्हिल हॉस्पिटलमधून ३ दिवसांपूर्वी अपहरण केलेली दीड वर्षांची चिमुकली अखेर सापडली आहे. या चिमुकलीला सीबीएस परिसरात सोडून देत अपहरणकर्ता फरार झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास ही चिमुकली सरकारवाडा पोलिसांना आढळून आली आहे. अपहरणकर्त्याचा शोध पोलिसांकडून सुरूच आहे.

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

अपहरणकर्त्याचा शोध सुरूच

हा सर्व प्रकार सिव्हिल हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. त्याची दखल घेत पोलिसांनी कडक नाकाबंदी करीत तपास पथके विविध दिशांना पाठविली. अखेर तीन दिवसांनी अपहृत मुलगी सापडली असून अपहरणकर्त्याचा शोध सुरूच आहे