सीनिॲरिटी कोणती, शिवसेनेची की मंत्रिपदाची? भुजबळांनी येवल्यात काढली शिवसेनेची आठवण

येवला (नाशिक) : असे म्हणतात, की पहिले प्रेम माणूस कधी विसरू शकत नाही...तसेच राजकीय नेता आपला पहिला पक्ष विसरू शकत नाही, हेच पालकमंत्री छगन भुजबळांच्या सूचक बोलण्यातून जाणवले. शनिवारी (ता. ५) येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळांना पुन्हा शिवसेनेतील सीनिॲरिटी आठवली..! शिवसेना सोबत सत्तेत असल्याने आपुलकीचे बोलणे साहजिकच आहे, पण त्यातही प्रेमाचा ओलावा असेल तर..! याचे उत्तर शनिवारी मिळाले...

मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांच्या हस्ते अंगणगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन झाले. या कार्यक्रमात अध्यक्ष भोलानाथ लोणारी व संचालक मंडळाने पाच ते सहा मागण्यांचा फलक व्यासपीठाच्या समोर लावला. त्यानंतर आमदार किशोर दराडे यांनी मनोगतातून उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेचे असल्याने आम्ही पाठपुरावा करू पण साहेब, तुम्ही यासाठी पुढाकार घ्या व मंत्रालयात आपल्या उपस्थितीत उद्योगमंत्र्यांसमवेत संचालक मंडळाची बैठक घेत प्रश्न निकाली काढावेत, अशी अपेक्षाही दराडे यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

यावर बोलताना भुजबळांनी, मंत्री तुमच्या पक्षाचे असल्यावर माझ्याकडे कामे ढकलता का, अशी मिश्‍कील गुगली टाकली. त्यावर मास्टरमाइंड दराडे यांनी साहेब, तुम्ही सीनिअर आहात. हा धागा पकडून भुजबळांनी पुन्हा कोणती सीनिॲरिटी शिवसेनेतली की मंत्रिपदाची, असा मार्मिक सवाल केला. 
भुजबळांचे हे कोड्यातले बोलणे गमतीचा भाग असला तरी शिवसेनेप्रति असलेला त्यांच्या मनातील भाव पुन्हा व्यक्त झाला. या वेळी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधत कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. यावर भुजबळांनी जागेवरूनच उत्तर देत, खासदारांना सांगा, पवारसाहेब अन् आम्ही मागणी करून थकलो आहोत. तुमच्या खासदारांना याबाबत लक्ष घालायला सांगा, अशा सूचना करून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कसे दुर्लक्ष करते हे अधोरेखित केले. 
 
लासलगावलाही शिवसेनेचे उदाहरण 

येथे भुजबळांना यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याच्या संदर्भात पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी पवारसाहेब वडिलकीच्या नात्याने बोलले. जो इतिहास सांगितला जातो त्याला टोचून बोलणे म्हणत नाही, असे सांगत, मीही कोणी विचारले तर शिवसेनेने माझ्यावर हल्ले केल्याचा इतिहास सांगतो. याचा अर्थ टीकाटिप्पणी होत नाही तर तो इतिहास सांगितला जातो, असे सांगताना भुजबळांनी येथेदेखील शिवसेनेविषयी सहानुभूतीचे बोल व्यक्त केले. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

भुजबळांचा दौरा झाला सर्वपक्षीय 

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात गेल्या वर्षभरापासून सर्वपक्षीयांचा समावेश लक्ष वेधून घेतो. भुजबळांच्या दौऱ्यात शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे बैठका किंवा उद्‍घाटनाच्या निमित्ताने सहभागी असतात, तर काँग्रेसचे पदाधिकारीदेखील त्यांच्या दौऱ्यावर असतात. मात्र शनिवारी पालिकेच्या सर्व कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांना खासदार भारती पवार यांच्यासह भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवकही उपस्थित असल्याने त्यांचा दौरा सर्वपक्षीयांचा झाल्याचे बोलले गेले.