सीसीटिव्हीत प्रेट्रोल चोरटा कैद; इंधनावर डल्ला वाढतोय

सिडको (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – जुने सिडको भागात आता रात्री घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीतून पेट्रोल चोरुन नेण्याचे प्रमाण वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १०० रुपयांवर असल्याने आता चोरट्यांनी चक्क गाड्यांमधील इंधनावर डल्ला मारण्याचे काळे धंदे सुरु केले आहे. विशेष म्हणजे परिसरातील व्हाईट कॉलर तरुणच इंधनचोरी करु लागल्याने वाहने आता कुठे लपवायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जुने सिडकोतील सावरकर चौकात मंगळवारी रात्री घरासमोर पार्किंग केलेल्या ५ ते ६ ठिकाणी एका चोरट्याने दुचाकीच्या इंधनाला पेट्रोल पुरवठा करणारे पाईप तोडून गाडीतील सर्व पेट्रोल चोरून नेले आहे . सकाळी दुचाकी सुरु करताना पेट्रोल चोरीला गेल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला आहे. विशेष म्हणजे हा चोरटा व्हाईट कॉलर असून तो परिसरातीलच असावा, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. सिडको भागात अंबड पोलिस ठाण्याचे बिट मार्शल तसेच पोलिसांची रात्रीची ग्रस्त कमी झाल्याने भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी सिडको भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महागाई, बेरोजगारी कारणीभूत

चोरट्यांच्या मनोवृत्तीबाबत एका मानसशास्त्र प्राध्यापकाने टिप्पणी करताना म्हटले आहे की, सर्वांच्या सर्वाधिक गरजेच्या वस्तूंच्या किंमती वाढल्या की सर्वाधिक चोऱ्या या त्याच वस्तूच्या होत्यात. तसेच चोरटे हे बहुधा शिक्षित, बेरोजगार तरुणच असतात. यातील आणखी एक मुद्दा म्हणजे बेरोजगारी वाढल्याचे किंवा पगारात फारशी वाढ नसली की हे प्रकार सुरु होतात. हा केवळ भारतासारख्या विकसनशील देशातच घडणारा प्रकार नसून श्रीमंत राष्ट्रातही असे प्रकार नियमित घडत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सिडको भागात दुचाकीतून पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली पाहिजे. -मनोज बाविस्कर, रहिवाशी

हेही वाचा: