“सुट्टे नाणे नको रे बाबा”; ग्राहक-दुकानदारांमध्ये होतायत वाद

नाशिक : काही वर्षांपूर्वी सुटी नाणी व्यवहारात नसल्याने मोठी समस्या उद्‌भवायची. एक-दोन रुपयांचे व्यवहार राहिले नाहीत. या सुट्या नाण्यांवरून ग्राहकदुकानदारांमध्ये वाद रंगतात. कालाय तस्मै नमः म्हणजेच काळ हा बलाढ्य असतो. काळ बदलला आहे. १९८५ ते २००० दरम्यात सुटी नाणी नसली तर कुपण दिली जात. तसेच सुट्या पैशांऐवजी चॉकलेट देण्याचा पर्याय दुकानदारांनी स्वीकारला होता. सुटी नाणी मुबलक मिळू लागल्याने त्यांची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न बॅंका, दुकानदार व नागरिकांना पडला आहे. 

चिल्लरचे करायचे काय?

आता एक, दोन, पाच व दहा रुपयांची मुबलक नाणी व्यवहारात आली आहेत. त्यांचे प्रमाण इतके झाले आहे, की बॅंका, दुकानदार ती स्वीकारात नाही. चिल्लर ठेवण्यास जागा नसल्याने दिवसाला एका ग्राहकाकडून शंभर रुपयांपर्यंतच चिल्लर काही बॅँका स्वीकारत आहेत. तर ज्या बॅंकेत खाते आहे तेथेच चिल्लर जमा करण्याचा सल्ला काही बॅंका देतात. किंवा पहिले आमच्या बॅंकेत खाते उघडा मगच चिल्लर स्वीकारू, असे सांगितले जाते. मागील वर्षी दुर्गा गार्डन येथील स्टेट बॅंक शाखेने नाण्यांचे मशिन लावले होते. नागरिक पन्नास, शंभरची चिल्लर त्यातून घ्यायचे. आता बरेच व्यवहार हे सुटे नाणीच्या हिशेबात राहिली नाहीत. म्हणजे चहा- दहा, वडा पाव- १५-२०, गोळ्या औषधे पाचरुपयांपासून पुढे त्यामुळे एक-दोन रुपये हिशेबातील व्यवहार आता संपुष्टात आले आहेत.

बँकांकडून मुबलक चिल्लर 

स्टेट बॅंकेसारख्या काही बॅंका ग्राहकांना मुबलक चिल्लर उपलब्ध करत आहेत. मात्र, व्यापारी किंवा आस्थापनाने किमान ५० हजार व त्याच्या पटीत एक, दीड, अडीच अशा पटीत चिल्लर घ्यावी लागते. दोनच्या नाण्यांची पाचशेची, पाचच्या नाण्यांची साडेबारा, तर दहाच्या नाण्यांची वीस हजारांची बॅग घ्यावी लागते. सामान्य नागरिकांना किमान वीस हजारांची चिल्लर मिळते. तथापि, नागरिकांना चिल्लर भरायची असेल तर दिवसाला जास्तीत शंभर नाणी स्वीकारण्याचे धोरण काही बॅंकांनी स्वीकारले आहे. सुटी नाणी आम्ही शक्यतो बँका घेत नाहीत. कारण ठेवायला अडचण येते. मात्र, ग्राहकांना नाराज करता येत नाही. त्यांच्याकडून ती स्वीकारावी लागतात. ती जास्त झाल्यास टोल नाका, मोठे व्यापारी, किराणा दुकानदार, मेडिकल दुकानदार यांना देतात.