सुताचे भाव वाढल्याने यंत्रमाग उद्योग बॅकफूटवर; किलोमागे ५० रुपयांनी वाढ

मालेगाव (नाशिक) : कोरोना लॉकडाउननंतर पूर्वपदावर येऊ पाहत असलेल्या यंत्रमाग उद्योगाला सुताच्या भाववाढीने झटका दिला आहे. सुताच्या दरात किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, उत्पादनखर्च मीटरमागे एक ते दीड रुपयांनी वाढला आहे. कॉटनचा उत्पादन खर्चही वाढला आहे. खर्च वाढल्यामुळे उभारी घेण्यापूर्वीच हा उद्योग बॅकफूटवर आला आहे. उद्‌भवलेल्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी येथील यंत्रमागधारकांची मंगळवारी (ता. २४) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

यंत्रमागधारकांचा जीव भांड्यात पडला

राज्यात मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी व सोलापूर आदी ठिकाणची अर्थव्यवस्था यंत्रमागाच्या खडखडाटावर अवलंबून आहे. कोरोनामुळे मार्च ते जून या कालावधीत यंत्रमाग पूर्णपणे बंद होते. जुलैपासून हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येवू लागला. उत्पादन वाढत असतानाच प्रक्रिया उद्योग बंद असल्याने कापडाचे गुदामे भरले होते. मुंबई, अहमदाबाद, सुरत, पाली, बालोत्रा आदी ठिकाणी कच्च्या मालावर प्रोसेसिंग केली जाते. यंत्रमाग सुरू होत असले तरी प्रोसेसिंग युनिट असलेली शहरे बंद होती. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर प्रोसेसिंग युनिट टप्प्याटप्प्याने सुरू झाल्याने यंत्रमागधारकांचा जीव भांड्यात पडला. उद्योग रुळावर येत असताना कच्च्या मालाचे दर वाढल्याने पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ पाहत आहे.

व्यावसायिकांना तारेवरची कसरत

कोरोनामुळे दिवाळीत नेहमीसारखी कपड उद्योगात उलाढाल झाली नाही. त्यामुळे दिवाळीच्या भरवशावर तयार केलेला ४० टक्के माल पडून आहे. सुताचा भाव किलोला १६० रुपये होता. तो आता २१० रुपयांवर पोचला आहे. एक मीटर कापड उत्पादनाचा खर्च ११ रुपये ६० पैसे होता. तो वाढून १२ रुपये ४० पैसे झाला आहे. पॉलिस्टर व कॉटन मिक्स असलेल्या कापडाचा एका मीटरचा उत्पादनखर्च १४ रुपये २५ पैसे असा झाला आहे. कॉटन कपड्याचा उत्पादनखर्च २२ रुपये ५० पैसे आहे. तर त्याची विक्री २१ रुपये ५० पैशाने होत आहे. उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसविताना व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कापडाला मागणी वाढल्यास व्यवसाय स्थिरावेल

दिवाळीचा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असली तरी कापड उद्योगात अपेक्षित उलाढाल झाली नाही. व्यावसायिकांच्या अपेक्षा आता आगामी लग्नसराईवर अवलंबून आहेत. कोरोना नियंत्रणात आल्यास लग्नांमधील धामधूम वाढेल. परिणामी, कापड उद्याेगाला चालना मिळेल, अशी अपेक्षा यंत्रमागधारक बाळगून आहेत. जानेवारी ते मे हा यंत्रमाग व्यवसायातील हंगामाचा कालावधी ओळखला जातो. या कालावधीत मोठ्या बाजारपेठांमध्ये खरेदीची झुंबड उडाली तर व्यावसायिकांबरोबरच लाखो कामगारांनाही मोठा दिलासा मिळेल.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

सुताचे दर वाढल्याने यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्पादनखर्च वाढल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी यंत्रमागधारकांची बैठक होणार आहे. शासनाने लाखो कामगारांचा विचार करून या उद्योगाला दिलासा देण्यासाठी कोरोना काळातील वीजबील माफ करण्यात यावे. - युसूफ इलियास अध्यक्ष, मालेगाव पॉवरलूम कमिटी

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या