नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांसह मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बडगुजर यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. नगरसेवक असतानाही बडगुजर यांनी त्यांच्या कंपनीस मनपाची कामे मिळवून दिल्याची तक्रार तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २०१६ मध्ये केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रारीची विभागाने खुली चौकशी सुरू केली होती. चौकशीत सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या स्वत:च्या मे. बडगुजर ॲड बडगुजर कंपनीतून डिसेंबर २००६ मध्ये निवृत्ती घेतल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती महापालिकेत सादर केली. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी नगरसेवक व इतर पदे भूषविले. मात्र, हे करत असताना त्यांनी या पदांचा वापर करून त्यांच्या बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीस महापालिकेकडून विविध विकासकामांची ठेके मिळवून दिले. २००६ ते २००९ या कालावधीत त्यांनी त्यांच्या कंपनीस ३३ लाख ६९ हजार ४३९ रुपयांचे ठेके मिळवून देत स्वत:चा आर्थिक फायदा केला व महापालिकेची फसवणूक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्याने विभागाने रविवारी (दि.१७) सरकारवाडा पोलिस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह साहेबराव रामदास शिंदे व सुरेश भिका चव्हाण यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक, दस्तऐवजांचे बनावटीकरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आपल्याविरोधात राजकीय सुडातून कारवाई केली जात असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला आहे.
तिसऱ्या दिवशीही चौकशी
दहशतवादी सलीम कुत्ता सोबतच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.१७) सायंकाळी गुन्हे शाखेने चौकशी केली. सुमारे दीड तास चौकशी झाल्यानंतर बडगुजर हे गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.
नाशिक महापालिकेतील फसवणूक, बनावट दस्तऐवजीकरणाबाबत तक्रार होती. त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
एसीबीकडून घरझडती
गुन्हा दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुधाकर बडगुजर यांच्या निवासस्थानासह कार्यालयाची रविवारी (दि.१८) रात्रीपर्यंत झडती घेतली. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील इतर दोन संशयितांच्या निवासस्थानीही विभागाने झडती घेतली. झडतीत काय आढळले याबाबत विभागाने माहिती गुलदस्त्यात ठेवली आहे.
हेही वाचा :
- गुलमर्गचे तापमान उणे 2.8; माऊंट अबूचे उणे 1
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, १८ डिसेंबर २०२३
- कोल्हापूर : वडणगे येथे लोकसहभागातून साकारले क्रीडांगण
The post सुधाकर बडगुजरांविरोधात 'एसीबी'चा गुन्हा appeared first on पुढारी.